ठाणे : पोलीस दिनानिमित्त देशभरातील ४२३ शहीद पोलिसांना ‘स्मृती स्तंभाला’ पुष्पचक्र वाहून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी मानवंदना दिली. सकाळी झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील शहीद पोलीस कुटूंबियांसह अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.लडाखमधील भारताच्या बर्फाच्छादित सीमेवरील हॉटस्प्रिंग याठिकाणी २१ आॅक्टोबर १९५९ रोजी १० पोलीस जवान गस्त घालत होते. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनीही जशास तसे उत्तर देत अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिली. या हल्ल्यात दहा जवान शहीद झाले. या घटनेचा देशभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. जवानांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्टÑनिष्ठेची जाणीव व्हावी, म्हणून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ठाणे ग्रामीण पोलीस कार्यालयाजवळील स्व. निर्मलादेवी चिंतामणी दिघे उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्षभरामध्ये देशभरात शहीद झालेल्या ४२३ पोलिसांच्या नावांचे वाचन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी केले. पालकमंत्री शिंदे यांनी शहीद स्तंभाला पुष्पचक्र वाहून मानवंदना दिल्यानंतर ठाण्याचे खा. राजन विचारे, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार (गुन्हे शाखा), केशव पाटील (प्रशासन), प्रताप दिघावकर (पूर्व प्रादेशिक विभाग) तसेच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक महेश पाटील, पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी (ठाणे), संजय शिंदे (कल्याण), प्रमोद शेवाळे (उल्हासनगर), अविनाश अंबुरे (वागळे इस्टेट), दीपक देवराज (गुन्हे शाखा), अमित काळे (वाहतूक नियंत्रण शाखा) आणि मुख्यालयाचे संदीप पालवे यांसह शहीदांच्या कुटूंबियांनीही स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले.>४२३ शहिदांमध्ये महाराष्टÑातील तिघे : गेल्या वर्षभरामध्ये देशभरात ४२३ पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले. यामध्ये महाराष्टÑाच्या मुंबई पोलीस दलातील हवालदार सुनिल कदम, गडचिरोलीचे हवालदार सुरेश गावडे आणि अमरावती ग्रामीणच्या सतिश मढवी यांचा उल्लेख या वेळी करण्यात आला.>आयुक्तालयातील शहीद कर्मचारीठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असलेले फिरोज कोकणी आणि सलीम बेग यांना पोलीस हवालदार भालचंद्र कर्डीले यांनी ६ मे १९९८ रोजी मुंबईच्या जे. जे. रुगणालयात उपचारासाठी नेले होते. त्यावेळी पोलीस पथकाजवळ येऊन एकाने कर्डीले यांच्या दिशेने गोळीबार केला. यातील एक गोळी त्यांच्या बरगडीत लागल्याने ते जखमी होऊन खाली पडले. त्यांना जखमी अवस्थेत जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.उल्हासनगर येथील आरोपी राजेश शिवलानी हा पोलिसांच्या ताब्यातून पळून जात होता. त्यावेळी पोलीस नाईक तुकाराम कदम हे त्याला पाठलाग करुन पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून शहिद झाले.पोलीस हवालदार रमेश जगताप आणि बाळू गांगूर्डे हे ५ जुलै २००६ रोजी निजामपुरा पोलीस ठाणे येथे बंदोबस्तासाठी तैनात होते. पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामास एका गटाने विरोध करुन त्यावेळी दंगल केली. याच दंगलीमध्ये जमावाच्या मारहाणीत जगताप आणि गांगुर्डे हे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले.
शहीद पोलिसांना ठाण्यात मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:31 AM