ठाणे : शहापूर तालुक्यातील डोंगरपाडा या आदिवासीपाड्यातील संकेत अशोक टापले (७) हा अर्नाळा आश्रमशाळेत वास्तव्याला होता. तिथून तो ठाणे रेल्वे स्थानकात अचानक आला आणि रेल्वे पोलिसांनी त्याला भिवंडीच्या बालसुधारगृहात दाखल केले. आता आॅपरेशन मुस्कानअंतर्गत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने त्याच्या पालकांचा शोध घेऊन त्याला त्यांच्या स्वाधीन केले. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.वयाच्या पाचव्या वर्षी आईवडिलांचे छत्र हरपल्यानंतर तो शहापूरच्या डोंगरपाड्यातील त्याच्या आजीआजोबांकडे राहू लागला. त्या पाड्यावरील बरीच मुले आश्रमशाळेत जाऊ लागल्याने आजीआजोबांनीही त्याला अर्नाळा येथील आश्रमशाळेत पाठविले. मात्र, या आश्रमशाळेतून १६ जून २०१५ रोजी तो अचानक बेपत्ता झाला आणि थेट ठाणे रेल्वे स्थानकावर येऊन पोहोचला. रेल्वे पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन भिवंडीच्या बालसुधारगृहात दाखल केले. याचदरम्यान ठाणे पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या आॅपरेशन मुस्कानअंतर्गत चाइल्ड प्रोटेक्शन युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक कामालुद्दीन शेख, पोलीस उपनिरीक्षक राजीव मोरे, हवालदार प्रतिमा देसाई आदींच्या पथकाने त्यास त्याच्या आईवडिलांबाबत विचारले. मात्र, त्याला काहीही सांगता येत नव्हते. मोरे यांनी त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने वडिलांचे नाव अशोक आणि आडनाव गुलाबबाई तर पत्ता शहापूर, आगाशी इतकाच सांगितला. या तुटपुंज्या पत्त्याच्या आधारे त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. सखोल चौकशीत त्याच्या आईवडिलांचे निधन झाले असून आजी गुलाबबाई यांच्याकडे तो वास्तव्याला होता, अशी माहिती पुढे आली. गुलाबबार्इंचा मासळी विक्रीचा व्यवसाय असल्याचेही त्याने सांगितल्यावर शहापूर आणि आगाशी पोलीस ठाण्यात तसेच एसटी स्थानक, शाळा अशा अनेक ठिकाणी त्याच्या ठावठिकाण्याची या पथकाने चौकशी केली. तेव्हा आगाशीजवळील एका जंगलाजवळचा रस्ता दाखविल्यावर त्याच्या आजीआजोबांचा शोध लागला. तेव्हा १३ जुलै रोजी या पथकाने त्याला पालकांच्या स्वाधीन केले. पत्ता किंवा नावही नीट सांगता येत नसलेल्या संकेतला पालकांच्या स्वाधीन केल्यानंतर आजी आणि नातवाने एकमेकांना जोरदार मिठी मारली तेव्हा पोलिसांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. बेपत्ता संकेतचा अचानक शोध लागल्यामुळे पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.
शहापूर तसेच भिवंडीतील हरवलेल्या मुलांचा लागला शोध
By admin | Published: July 21, 2015 4:44 AM