लोकमत न्यूज नेटवर्कआसनगाव: भारतीय शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींना यंदा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १ हजार २४१, रमाई आवास योजनेंतर्गत १५२, तर शबरी घरकुल योजनेतून ३१५ अशी एकूण १ हजार ७०८ घरकुले शासनाकडून मंजूर करण्यात आली आहेत. यंदा ज्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत, त्यांच्या बँक खात्यावर तेव्हाच आॅनलाइन ३० हजार जमा झाले. त्यामुळे या लाभार्थ्यांनी मोठ्या आनंदात घरांचे बांधकाम सुरू केले. मात्र, नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलनटंचाईने बहुतांश वेळ बँकेसमोरील भल्यामोठ्या रांगांमध्येच वाया गेल्याने मिळालेल्या पहिल्या हप्त्यातच हे बांधकामाचे काम करावे लागले. आधी नोटाबंदी आणि मग पाणीटंचाईचा फटका या योजनेला बसला. तालुक्यात अनेक ठिकाणी उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे अनेक लाभार्थ्यांना बांधकामासाठी आवश्यक असणारे पाणी विकत आणावे लागले. पावसाळा तोंडावर आल्याने हे काम पूर्ण होणार कसे, असा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.विटा, सिमेंट, मजुरी, वेळेला उधारी, उसनवारी अशी अनेक दिव्ये पार करून घरकुलांचे अर्धवट बांधकाम कसेबसे पूर्ण झाले. नियमाप्रमाणे दुसरा हप्ता म्हणून ६० हजार मिळतील, या आशेवर असलेल्या लाभार्थ्यांना अजूनही दुसरा हप्ता मिळालेला नाही. पंतप्रधान आवास योजनेतील १ हजार २४१ पैकी ६७५, रमाई योजनेतील १५२ पैकी ३४, शबरी घरकुल योजनेतील ३१५ पैकी ५६ लाभार्थ्यांनाच दुसरा हप्ता मिळाला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना अजूनही दुसरा हप्ता न मिळाल्याने त्यांची कामे खोळंबली आहेत.फक्त पहिला एकच हप्ता मिळाला. उधार व उसनवार करून अर्धवट काम केले. पावसाळा आला तरी शासकीय अनुदान मिळत नाही. घरावर छप्पर नाही. पाऊस पडला तर कुटुंब घेऊन जाऊ कुठे?- आदिवासी घरकुल लाभार्थी (सुरेश लहू मुकणे) ग्रुप-ग्रामपंचायत शेंद्रुणकाही लाभार्थ्यांचे खाते सहकारी बँकेत आहे. सहकारी बँकेत चलनतुटवड्यामुळे पुरेशी रक्कम मिळत नाही. घरकुल अनुदानही आॅनलाइन झाल्याने झालेल्या कामाचे फोटो अपलोड करावे लागत आहेत. येत्या दोन दिवसांत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ६० हजारांचा दुसरा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.- पी.बी. सोनावणे, प्रभारी सहायक गटविकास अधिकारी
शहापुरातील घरकुल योजना बारगळली
By admin | Published: June 01, 2017 4:49 AM