पंडीत मसणे/ लोकमत न्यूज नेटवर्कवासिंद : शहापूर तालुक्यात भातसा, तानसा, मोडकसागर, मध्यवैतरणासारखी धरणं असूनही तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या आहे. ही समस्या सुटावी यासाठी भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाद्वारे पाणी घेण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाला पाठवला आहे. हा प्रस्ताव पारीत झाल्यास तालुक्यातील ९७ गावे, ३४९ पाड्यांची तहान भागणार आहे. एकीकडे शहापूर तालुका हा पाण्याचा स्रोत मानला जातो. दुसरीकडे दरवर्षी धरणाच्या या तालुक्यात मार्च, एप्रिल, मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी २८ गावे, ८२ पाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली. ही झळ कमी करून इतर गावपाड्यांनाही मुबलक पाणी मिळावे यासाठी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून पाणी घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा योजनेसंदर्भात प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केला आहे.यामध्ये तालुक्यातील ९७ गाव, ३४९ पाड्यांसाठी भावली धरणाचे पाणी गुरुत्वाकर्षणाद्वारे उचलले जाणार असून, या प्रकल्प कामकाजासाठी १८० कोटी खर्चाची तरतूद अपेक्षित केली आहे. सध्या १ लाख ३५ हजार एवढ्या लोकसंख्येला हे पाणी मिळेल व यापुढे सन २०५१ पर्यंत २ लाख ६३ हजार ५०० इतक्या लोकसंख्येला हा पाणीपुरवठा होईल, असे प्रस्तावित केलेले आहे. या गावपाड्यासाठी दररोज (प्रतिदिन) ३५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.भावली धरणाचा पाणीसाठी ४०.७९ दशलक्ष घनमीटर असून, धरणाची लांबी १२०५.०० मीटर तर उंची ३१.१८ मीटर आहे. दरम्यान एकीकडे शहापूर तालुक्यात तीन-चार मोठमोठी धरणं असतानादेखील धरणालगतच्या गावांनादेखील पाणीटंचाई समस्या जाणवत असून, या धरणाचा पाणी स्थानिक जनतेला मिळत नाही. त्यामुळे दुसऱ्या तालुक्यातून पाणी उचलण्याची वेळ शहापूर तालुक्यावर येऊन ठेपल्याने तालुक्याच्या दृष्टीने ही शोकांतिकाच आहे.""""प्रस्तावित भावली धरणातून पाणी मिळाल्यास शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त भागात एकमेव मार्ग सापडून टँकर मुक्त होतील.- आर. एम. आडे, उपअभियंता पाणीपुरवठा, शहापूरही योजना मार्गी लागावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.’- कपिल पाटील, खासदार, भिवंडी लोकसभा
भावली भागविणार शहापूरची तहान!
By admin | Published: May 31, 2017 5:41 AM