ठाणे : छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगरची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीतील नोंदीच्या आधारे गंगरच्या ‘लाभार्थ्यां’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. त्याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची वाढ केली.खंडणीप्रकरणी पोलिसांनी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगरलाही अटक केली होती. राजस्थान आणि गुजरातमध्ये मटक्याचा मोठा धंदा चालवणाºया गंगरच्या हवाला रॅकेटची पोलीस चौकशी करत आहेत. एका अंगडियामार्फत छोटा शकीलच्या हस्तकांना आर्थिक रसद पुरवणाºया या आरोपीची डायरी पोलिसांना मिळाली आहे. गंगरचा अर्थपुरवठा कुणाकुणाला होता, याची माहिती या डायरीतील नोंदींमधून मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, पोलीस कोठडी चार दिवसांनी वाढवण्यात आली.खंडणी प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना कासकरकडून आणखी काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि अनिस इब्राहिम यांची दुबईत मालमत्ता असल्याचे कासकरने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. तिघांचे दुबईत कार्यालय तसेच गेस्ट हाउस असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.कासकरच्या फोन कॉल्सची पडताळणी सुरू असून त्याच्या ई-मेलमध्ये फारशी महत्त्वाची माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले.गोराई येथील जागेच्या वादातून भार्इंदर येथील एका बिल्डरकडून खंडणी उकळल्याच्या तिसºया गुन्ह्यासंदर्भातही पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील एक आरोपी इंडोनेशियामध्ये असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शकीलच्या फायनान्सरची डायरी पोलिसांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:48 AM