लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनामुळे ठाणे परिवहनची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. ठेकेदारांची बिले देण्यासाठी घसाऱ्यापोटी बँकेतील पाच कोटींच्या ठेवी तोडण्याची वेळ परिवहन प्रशासनावर ओढवली आहे. तब्बल पाच महिन्यांपासून कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येत असलेल्या बसेसच्या ठेकेदारांचे बिल प्रशासनाकडून दिले नव्हते. या ठेवी तोडून जर ठेकेदाराला बिले अदा केली नसती तर बससेवा बंद करण्याचा इशारा सबंधित ठेकेदारांमार्फत परिवहन देण्यात आला होता.खासगी ठेकेदारांच्या सुमारे दोनशे बस टीएमटीला सेवा देत आहेत. या ठेकेदारांची मार्चपासूनची सुमारे ३५ कोटींची देणी शिल्लक आहेत. त्यांच्याकडे सीएनजी भरण्यासाठी आणि कामगारांची देणी देण्यासाठीही पैसे नसल्याने त्याने १५ आॅगस्ट पासून बससेवा बंद करण्याचा इशारा दिला होता . ठाणे महापालिकेबरोबरच ठाणे परिवहनची आर्थिक परिस्थिती देखील नाजूक असल्याने परिवहन सेवेकडे बिल अदा करण्यासाठी पैसेच नसल्याने अखेर ठेकेदारांची देणी देण्यासाठी घसारा रक्कमेची नऊ कोटीपैकीं पाच कोटींची बँकेतील ठेवी तोडण्यात आल्या आहेत.ठाणे परिवहन सेवेतील २७०पैकी अवघ्या ३७ बस रस्त्यावर धावत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना परिवहन सेवेत काम मिळत नाही. मोठया प्रमाणावर बस नादुरु स्त आहेत. त्यातच कोरोनाची पहिली आणि दुसरी लाटही आली. यातूनच परिवहनही परिस्थिती अधिकच नाजूक झाल्याने खाजगी बस ठेकेदारांची मार्च पासूनची देणी थकली होती. महानगर गॅसनेही या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबत सूचना केली होती. त्यामुळेच या ठेकेदाराने अखेर बस बंद करण्याचाच इशारा दिला होता.
* स्पेअर पार्ट अभावी अनेक बसेस आगारात उभ्या आहेत. कोरोनामुळे परिवहनच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला. पाच महिन्यांपासून बिल अदा न झाल्याने ठेकेदाराला बस चालविणे कठीण झाले होते. परिणामी, ठेवी तोडून बिले अदा करावी लागली.- भालचंद्र बेहेरे, व्यवस्थापक, परिवहन सेवा, ठाणे महापालिका