कल्याण : केडीएमसीच्या निवडणुकीत तिकीटवाटप करताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करून भाजपाच्या बंडखोरांनी बुधवारी केडीएमसी मुख्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी केली होती. दरम्यान, या नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून शुक्रवारी हे बंड शमून ते आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.उमेदवारी देताना निष्ठावंतांना डावलून बाहेरील व्यक्तींना प्राधान्य दिल्याचा आरोप करून काही नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडाचा पवित्रा घेऊन अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी उमेदवारी न मिळाल्याप्रकरणी स्थानिक नेतृत्वाला जबाबदार धरले असून शिवसेनेशी हातमिळवणी करून पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर केला आहे. प्रशांत माळी यांच्या नेतृत्वाखाली अन्य नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून बुधवारी लोकप्रतिनिधींचा निषेध केला होता. दरम्यान, गुरुवारी खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजांची समजूत काढणार असल्याचे सांगितले. पक्षात ६२५ जण इच्छुक होते, तर जागा १२२ होत्या. त्यामुळे सर्वांचेच समाधान होऊ शकले नाही. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कोअर कमिटीने उमेदवारीचे वाटप केल्याचे या वेळी स्पष्ट केले. नाराजांनी गैरसमजुतीतून आरोप केल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाने ११३ उमेदवार उभे केले असून जातीचे दाखले न मिळाल्याने दोन प्रभागांत उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. २७ गावांमध्ये १५ उमेदवार उभे केले असून उर्वरित प्रभागांत संघर्ष समितीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे या वेळी सांगितले.
नाराजांचे बंड शमवू : भाजपाला विश्वास
By admin | Published: October 16, 2015 1:57 AM