मीरारोड - 'संस्कृती मीरा भाईंदर आर्ट फेस्टिव्हल'च्या पहिल्या दिवशी शुक्रवारी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजाने मीरा भाईंदरकरांना भुरळ घातली तर शनिवारी सायंकाळी मराठी बाणा मधील गाण्यांना रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोकमधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानात प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने हा आर्ट फेस्टिव्हल शुक्रवार पासून सुरु झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी फेस्टिव्हलचे उद्घाटन केले. पहिल्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, वसई -विरारचे पोलिस आयुक्त सदानंद दाते, आमदार गीता जैन, महापालिका आयुक्त दिलीप ढोले, माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी विरोधी पक्षनेते धनेश पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष एड रवि व्यास, युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजू भोईर, विक्रमप्रताप सिंग, सचिन मांजरेकर आदी उपस्थित होते.
शुक्रवारी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पहिल्यांदाच शहरात महादेवन यांचा लाईव्ह कार्यक्रम असल्याने रसिकांनी मोठी गर्दी केली होती. महादेवन यांनी त्यांच्या खास शैलीतील गाजलेली गाणी सादर करताच रसिकांनी मैदान डोक्यावर घेत उत्स्फूर्त दाद दिली. शनिवारी अशोक हांडे यांच्या मराठी बाणा कार्यक्रमाचा आनंद रसिकांनी घेतला.
मंत्री चव्हाण यांनी, ठाण्यातील उपवन आर्ट फेस्टिव्हल प्रमाणेच मीरा भाईंदर फेस्टिव्हलसारखे कार्यक्रम सातत्याने आयोजित करून नागरिकांना कला - संस्कृतीचा आनंद देत राहण्याचे कार्य सरनाईक यांनी अखंडपणे चालवले आहे असे सांगितले. आठवले यांनी आर्ट फेस्टिव्हलमध्ये आपल्या उत्स्फूर्त कविता सादर केल्या. १२ डिसेंबर रोजी आर्ट फेस्टिव्हलचा समारोप असून दिवसभर हे नागरिकांसाठी मोफत खुले आहे. या ठिकाणी रांगोळी प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, विविध कला प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.