ठाणे: राष्ट्रवारदी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ठाण्यातील आनंदनगर चेक नाका येथे कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी जोरदार स्वागत केले. त्यानंतर शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या श्रीरंग सोसायटीतील घरी जाउन त्यांनी सदीच्छा भेट घेतली. पक्षाच्या बळकटीसाठी सुहास यांना साथ द्या, अशी साद त्यांनी या कुटूंबीयांच्या भेटी दरम्यान घातली. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेल्या नजीब मुल्लांच्या बालेकिल्ल्यातही मोठया साहेबांच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच शक्तिप्रदर्शन केल्याचेही पहायला मिळाले.
पवार हे कल्याण, नवी मुंबई दौऱ्यावर आले होते. कल्याणला जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवाध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या वेशीवरील कोपरी चेक नाका येथे जंगी स्वागत केले. यावेळी फुलांची उधळणही करण्यात आली. त्यांच्यासमवेत राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो,’‘पुरोगामी महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार’ अशा घाेषणांच्या गजरातच पवार यांचे दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास हे स्वागत करण्यात आले.
साधारण अर्धा किलोमीटर कार्यकर्ते साहेबांच्या गाडीमागे पायी जात होते. त्यांची छबी टिपता येईल, या आशेपोटीही अनेक कार्यकत्यार्ंनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. मात्र, साहेब गाडीतून न उतरल्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली. त्यानंतर श्रीरंग सोसायटीतील सुहास देसाई यांच्या सायली ८- सी या निवासस्थानी ते गेले. तिथे सुहास यांच्या पत्नी सायली यांच्यासह कुटूंबीयांनी त्यांचे औक्षण करीत स्वागत केले. या दरम्यान, श्रीरंग सोसायटीमध्ये त्यांचे ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करीत जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी तुम्ही सुहास यांना अशीच साथ द्या. आपण एकत्रित पक्षाला बळकट करु, असे आवाहन यावेळी पवार यांनी देसाई कुटूंबीयांसमवेत संवाद साधतांना केला.
मुल्लांच्या बालेकिल्ल्यातही शक्तीप्रदर्शन-राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा बालेकिल्ला असलेल्या राबोडी आणि श्रीरंग सोसायटी परिसरात यावेळी शरद पवार गटाने जोरदार घाेषणाबाजी करीत शक्तीप्रदर्शन केले. यादरम्यान काहीकाळ श्रीरंग सोसायटी याठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती.