ठाणे : तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निमार्ता शरद पवार हेच आहेत. हे अख्या जगाला माहित आहे. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही, अशी थेट टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात अजित पवार यांच्यावर केली. ठाण्यात पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत. ज्यांनी तुम्हाला घडवले, त्यांच्यावर बोलता, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला. हा पक्ष त्यांना दावणीला लावायचा होता, दुसर्या पक्षात विलीन करायचा होता. पण शरद पवार त्यांना अडसर ठरत होते, असाही गंभीर आरोप आव्हाड यांनी केला.
मी कोणाला विचारुन आंदोलन केलं नाही आणि करणारही नाही. खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार यांची आहे, असे कोणीही सांगेल. माझं आंदोलन शरद पवारसाहेब सुद्धा अडवू शकत नाहीत किंवा रोखू शकत नाहीत. जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मी परत कधी त्यांना भेटलोच नसल्याचा दावा त्यांनी केला.
यासाठी हवा होता शरद पवार यांचा राजीनामा -शरद पवार यांचा राजीनामा तुम्हाला का हवा होता? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला. ते जर बारामतीतून निवडणूक लढवत असतील तर यात गाजावाजा करण्याची गरज काय? तुमचं प्लॅनिंग कधीपासून होते, हे स्वत: विचार करा. पाच वर्ष पवार साहेबांचे डोके कोणी खाल्लं?भाजपसोबत चला हे कोण कोण सांगायचे, याचे चिंतन करा.
... म्हणून बाप होता येत नाही शरद पवार यांचा राजकीय प्रवास धुळीत मिळवून सत्तेत यायचे, हे आपल्या हवे होते. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही. काकाच्या पाठीत सुरा कोणी भोसकला, स्वत: च्या ताईला त्रास कोणी दिला, असे म्हणत आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली.
महाराष्ट्राने सावध राहावे - आव्हाड आपल्याकडे पण निवडणुका लागल्या की सर्व स्वस्त होईल. निवडणुका झाल्या की परत महाग होईल. त्यामुळे महाराष्ट्राने सावध राहावे , असा सल्लाही आव्हाड यांनी दिला. पवार साहेबांनी आधीपासून जातीयवादी शक्तीसोबत हात मिळवणी केली नाही ही यांची अडचण होती, असेही असे आव्हाड म्हणाले.