Jayant Patil on Thane hospital deaths tragedy: ठाण्यात उपचाराअभावी महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूनंतर, आता अधिकच धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर येत असतानाच, आता एकाच रात्रीत सुमारे १६-१७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरे डॉक्टर आणि कर्मचारी क्षमता तसेच रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे एकाच रात्रीत या अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. यातील १३ रुग्ण हे ICU मधील, तर चार रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते. दरम्यान, या रुग्णांना आजारपणाच्या शेवटच्या क्षणी आणले असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट केले.
"ठाणे महानगरपालिका क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये रात्रभरात तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. 'शासन आपल्या दारी' म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारात मात्र आरोग्य सुविधांचा अभाव आहे. हॉस्पिटलमध्ये पुरेशा आरोग्याच्या सुविधा नाहीत, डॉक्टर्स नाहीत, स्टाफ नाही त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी सहाजिकच मर्यादा येतात. त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतोय. लोकांचे नाहक जीव जात आहेत. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालावे. आपले नातेवाईक गमावलेल्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली," असे ट्विट जयंत पाटील यांनी केले.
दरम्यान, एका रात्रीत १७ रूग्ण दगावल्याच्या वृत्ताला रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने, तर काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉकटर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. १० ऑगस्टला एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. आता केवळ रात्री १०.३० पासून सकाळी ८.३० पर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.