ठाणे : आमच्यासाठी शरद पवार हे कालही श्रद्धेय होते आजही श्रद्धेय आहेत. पण शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसारच व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निर्णयानुसार आम्ही पवार यांच्याऐवजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र पक्ष कार्यालयात वापरत आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आणि बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी २ जुलै २३ रोजी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली तेव्हा ठाण्यातील मी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, आणि ठाण्यातील तमाम कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. ९ ऑगस्टला ठाणे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन स्वतः अजित पवार यांच्या हस्तेच संपन्न झाले होते. यावेळी आम्ही आमच्या कार्यालयाच्या बोर्डावर शरद पवार यांचेच छायाचित्र लावले होते. पण वारंवार शरद पवार यांनी आवाहन केले होते की, माझ्यापेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेणाऱ्यांनी माझे छायाचित्र कोठेही लावू नये. शरद पवार यांच्या आदेशाचे पालन करुन राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयाच्या बोर्डावरुन, अत्यंत दुखावेगाने व वेदनेने शरद पवार यांचे छायाचित्र आम्ही बदलले आणि त्याठिकाणी पवार गुरु, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राच्या विकासाचा पायाभरणी करणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावले. आमच्या पक्षाची अधिकृत भूमिकेनंतर आता आम्ही, फेसबुक असो, वेबसाईट असो, ट्विटर असो की फलक असो आम्ही पवार यांचे छायाचित्र कोठेही वापरत नाही अशी भूमिका आनंद परांजपे यांनी मांडली आहे.