ठाणे : कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून कायदे तयार केले आहेत. मात्र त्याच कायद्यांचा अशा चुकीच्या पद्धतीने वापर होत असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. न केलेल्या गुन्ह्यात विरोधकांना अडकवले जात असेल तर तो माणूस खचणार. त्यामुळेच व्यथित होऊन आव्हाड यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र आव्हाड हे शरद पवार यांना दैवत मानतात. त्यांचा जो निर्णय असेल तो आव्हाड यांना पाळावाच लागेल, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाण्यात केले.
आव्हाड यांना पद्धतशीर गोवण्याचा प्रयत्न होत असून, घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री त्या महिलेसोबत दिसत असल्यामुळे या प्रकाराची योग्य चौकशी करून जे दोषी असतील त्यांचा व मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
पवार म्हणाले की, ७२ तासांत माजी कॅबिनेट मंत्र्यांवर दोन-दोन गुन्हे दाखल होतात, हे घाणरडे राजकारण सुरू आहे. आज सरकार बदलल्याने विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करीत असेल तर ही लाजिरवाणी बाब आहे. सरकार येत असते, जात असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि पोलिसांनी हे सांगणे अपेक्षित होते की, आव्हाड यांनी कुठलेही गैरकृत्य केलेले नाही. अशा पद्धतीने राजकारण करून लोकशाही, राज्यघटना याला तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे.
मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही - पवार राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, असे पवार यांनी सांगितले. सध्याच्या सरकारकडे १४५ आमदारांचा पाठिंबा आहे, तो कमी होईल असे चित्र दिसत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना आमच्याकडेही १४५ आमदारांचे संख्याबळ होते. मात्र एक गट बाहेर पडल्याने सरकार कोसळले. परंतु संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकीचे भाकीत कसे केले, याची माहिती मी त्यांच्याशी चर्चा करून घेईन, असे पवार म्हणाले.