कल्याण : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाची दावेदारी असलेल्या राष्ट्रवादीतही बैठका आणि मेळाव्यांना प्रारंभ झाला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे आणि कल्याणमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. एकीकडे उमेदवार कोण? याबाबत स्पष्टता झालेली नसताना, दुसरीकडे या कॉन्फरन्सद्वारे होणारी चर्चा आणि चाचपणीच्या माध्यमातून कोणता निर्णय पवार घेतात? याबाबत उत्सुकता आहे.राष्ट्रवादीकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे यांचे, तर कल्याण मतदारसंघासाठी ठाण्याचे नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव पुन्हा निश्चित झाले आहे. त्यामुळे शिंदे यांच्याविरोधात कोण उभा राहणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर अंतर्गत गटबाजी आहे. डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचे वादविवाद पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहेत. त्यामुळे बुधवारच्या व्हिडीओ कॉन्फरन्सकडे सर्वांचे लक्ष आहे.
शरद पवार आज साधणार कल्याण, ठाण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 5:41 AM