Devendra Fadnavis ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन १० दिवस झाले असले तरीही अद्याप नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. सत्तेचं समीकरण स्पष्ट न झाल्याने राजकीय अनिश्चितता असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. म्हात्रे यांच्या या भेटीविषयी अनेक तर्क-वितर्कही लावले जात होते. मात्र आता त्यांनी खुलासा करत मी माझ्या वैयक्तिक कामासाठी फडणवीस यांची भेट घेतल्याचं सांगितलं आहे.
बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले की, "मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. फडणवीस यांच्या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. राजकीय विषय असता तर दुपारी २ वाजता गाडी घेऊन कोण भेटायला जाईल? परंतु प्रसारमाध्यमांनी वेगवेगळे तर्क लावले आहेत. मी खासदार आहे, आमदार नाही. शरद पवार यांना सोडण्याचा प्रश्नच नाही. मी त्यांच्याच पक्षात आहे," असं म्हणत म्हात्रे यांनी आपली बाजू मांडली आहे.
निलेश लंके यांच्या वक्तव्यानेही संभ्रम
पारनेर तालुक्यातील सुपा येथे दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या चिंतन मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे. "आपले भविष्य उज्ज्वल आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला विसरणार नाही. भल्या भल्यांना नेस्तनाबूत करण्याची धमक व ताकद आहे. कोणी म्हणत असेल सरकार, आमदार आम्ही आहोत. मात्र, एका रात्रीत सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून आम्हीही बसू शकतो. एक महिन्याच्या कालावधीतच एक गूड न्यूज कळेल," असा गौप्यस्फोट निलेश लंके यांनी केला आहे.