डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये सर्वत्र शेअर पद्धतीने रिक्षा धावत असताना ठाकुर्ली, सारस्वत कॉलनी परिसरातही ही सेवा सुरू करा, अशा मागणीचे पत्र सारस्वत कॉलनी प्रभागाच्या नगरसेविका खुशबू चौधरी यांनी बुधवारी आरटीओला दिले आहे.
कल्याण येथील उपप्रादेशिक अधिकारी जयंत पाटील यांची चौधरी व त्यांच्या प्रभागातील नागरिकांनी भेट घेतली. या वेळी चौधरी यांना वस्तुस्थिती सांगितली. या वेळी झालेल्या चर्चेत ठाकुर्लीत रेल्वे समांतर उड्डाणपुलाचे काम पूर्वेत सुरू आहे. त्यामुळे त्या भागातून वर्षभरापासून रिक्षा जात नाहीत, त्यामुळे आधीच प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या सारस्वत कॉलनी परिसरातून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरूनच रिक्षा वाहतूक सध्या सुरू आहे; पण तेथे जाण्यासाठी, स्थानकातून बाहेर पडल्यावर अन्यत्र जाण्यासाठी नागरिकांना स्वतंत्रपणे २० रुपये देऊन रिक्षा करावी लागत आहे. ते योग्य नसून सर्वच नागरिकांना तो खर्च परवडणारा नाही. त्यामुळे शेअर पद्धतीनेही रिक्षा सुरू करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली. त्यावर ठाकुर्लीत शेअर पद्धतीने रिक्षा सुरू नसल्याचे प्रथमच समजल्याचे पाटील म्हणाले. यासंदर्भात माहिती घेऊन या परिसरात शेअर पद्धतीने भाडे आकारण्यासंदर्भात रिक्षाचालक व रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले.महिला उतरल्या रस्त्यावरशेअर पद्धतीने रिक्षाभाडे आकारणी करण्याच्या मागणीसाठी रविवारी सारस्वत कॉलनी प्रभागातील काही महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. या महिलांनी हातात कटआउट्स घेऊन शेअर रिक्षाची मागणी केल्याचे चौधरी म्हणाल्या.