डोंबिवली : भोपाळ येथे झालेल्या ६३ व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये डोंबिवलीतील शूटर शर्वरी भोईर हिने आठ पदकांची कमाई केली आहे. त्यात तीन सुवर्ण, तर पाच रौप्यपदकांचा समावेश आहे. नॅशनल रायफल असोसिएशन आॅफ इंडियाने ७ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा भरवली आहे. देशभरातून त्यात सुमारे ८०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी निवड चाचणीत ३८८ स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यात एका गटामध्ये आॅलिम्पिकपटू मनू भाकर हिला सुवर्ण, तर शर्वरी हिला कांस्यपदकाने मंगळवारी सन्मानित करण्यात आले. डोंबिवलीच्या गन फॉर ग्लोरी या संस्थेमध्ये शर्वरी ही शूटिंग रायफलचे प्रशिक्षण घेत आहे.
चार वर्षांच्या कालावधीत तिने आतापर्यंत एकूण ४३ पदकांचा मान मिळवला आहे. त्यामध्ये २५ सुवर्ण, ११ रौप्य, सात कांस्यपदकांचा समावेश आहे. संस्थेचे प्रशिक्षक धीरज सिंग, रोहन काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षकांच्या अहोरात्र मेहनतीमुळेच शर्वरी या स्पर्धेत उज्ज्वल यश मिळवू शकली, अशी प्रतिक्रिया तिची आई अस्मिता भोईर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.शर्वरीने भविष्यात आॅलिम्पिक स्पर्धेत देशाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा तिचे वडील जितेंद्र भोईर यांनी व्यक्त केली. तिच्या या यशासह तिच्या एकंदरीतच कारकिर्दीची दखल डोंबिवली जिमखान्याने घेतली असून, तिला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.