लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : बीएचएमएस परीक्षांचा निकाल नुकतात जाहीर झाला असून या परीक्षेत भिवंडी तालुक्यातील केवणी गावातील शेतकरी कुंटुबात जन्मलेली पौर्णिमा अंकुश पाटील हिने जिद्द व बिकट परिस्थितीवर मात करत यश संपादन केले आहे. मुलगी डाॅक्टर व्हावी असे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. ते तिने पूर्ण केले पण मुलीचे यश पाहण्याकरिता दुर्दैवाने वडील आज या जगात नाही.
पौर्णिमा हिचे वडील जवळपास दोन वर्षे हृदयविकाराच्या झटक्याने कोमामध्ये गेले होते. त्यामुळे तिला अभ्यासात असंख्य अडचणी आल्या; मात्र या सर्व अडचणींना पौर्णिमा मोठ्या धैर्याने सामोरे गेली. एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षेचा अभ्यास तर दुसरीकडे वडील रुग्णालयात. वडिलांच्या सेवेसाठी रुग्णालयात थांबलेल्या आईसाठी जेवण बनविण्यापासून ते घरातील सर्व कामे पौर्णिमा हिच्या खांद्यावर आली होती. ही सर्व घरची जबाबदारी सांभाळून पौर्णिमा हिने बीएचएमएस परीक्षेचा अभ्यासही केला. दुर्दैव म्हणजे काही दिवसांपूर्वीच तिचे वडील अंकुश पाटील यांचे निधन झाले. हे सर्व दुःख पचवून तिने वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत अभ्यास केला.
अंकुश पाटील यांचे किराणा दुकान होते. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे असे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी मुलीसाठी एम.एच.एफ.एस. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संगमनेर येथे जाऊन प्रवेश घेतला. घरची परिस्थिती बिकट असतानाही तिला पुढील शिक्षणासाठी कधीच अडचण भासू दिली नाही. दोन वर्षे वडिलांच्या आजारपणामुळे मृत्यूशी झुंज देत असताना अखेर वडिलांचे निधन झाले.अशा कठीण प्रसंगी मात्र तिने आपली जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास या जोरावर पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली आणि वडिलांचे स्वप्न साकार केले.
---------------------------------
पौर्णिमाच्या यशाचा ग्रामस्थांना अभिमान
केवणीसारख्या छोट्याशा गावात पौर्णिमा डॉक्टर झाली याचा सर्व ग्रामस्थ व कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे. तिच्या या यशामुळे तिच्यावर सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. यशाबद्दल तिने आई कुंदा, भाऊ मयूर, विशाल व सर्व कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. जर त्यांनी मला साथ दिली नसती तर मी आज डॉक्टर झाले नसते, अशी प्रतिक्रिया डॉ. पौर्णिमा पाटील हिने दिली आहे.