भिवंडी : पाेटाची खळगी भरण्यासाठी माणूस काहीही करण्यास तयार हाेताे. गरिबीमुळे घर साेडून मुंबईत कामाच्या शाेधात आलेली २१ वर्षीय तरुणी चक्क तरुण बनल्याचा प्रकार भिवंडीत उघड झाला आहे. मुलगी असल्याने आपल्याला त्रास सहन करावा लागू नये म्हणून ती मिळेल काम करून आठ महिन्यांपासून येथे राहत हाेती. पाेलिसांनी संशयावरून एका तरुणाला ताब्यात घेतले. मात्र, चाैकशीत त्याचे बिंग फुटून ती तरुणी असल्याचे उघड झाल्याने पाेलीसही चक्रावले आहेत.पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील छाया दशरथ माने या तरुणीने घरची हलाखीची परिस्थिती असल्याने कामधंद्याच्या उद्देशाने मुंबईची वाट धरली. मुंबईत काम न मिळाल्याने ती भिवंडीत आली. मिळेल ते मोलमजुरीचे काम ती करू लागली. लॉकडाऊन असल्याने तिला काही काम मिळाले नाही. मात्र, तिने जिद्द सोडली नाही. राहण्याची सोय नसल्याने इमारतीच्या आडोशाला ती झोपायची. या बिकट परिस्थितीत स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिने शक्कल लढवली आणि ती मुलगा बनली. त्यासाठी तिने स्वतःची वेशभूषा बदलून मुलांसारखे केस लहान केले. समीर शेख या नावाने ती वावरू लागली. त्यामुळे परिसरात तिला काेणी ओळखू शकले नाही. लॉकडाऊनच्या काळात शांतिनगर परिसरात पोलीस गस्त घालत असताना त्यांनी एका मुलाकडे संशयावरून विचारपूस केली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू केली असता हे सत्य उघड झाले.
पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीनभिवंडी पोलिसांनी तिच्याकडून माहिती काढून तिचा घरचा पत्ता घेतला. ती पुण्यातील हडपसर परिसरात राहत असून तिचे खरे नाव समजल्यावर शांतीनगर पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात चौकशी केली. तेव्हा ही मुलगी आठ महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे समजले. त्याबाबत तिच्या कुटुंबीयांची तक्रार केली हाेती. पोलिसांनी दोन दिवसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांना भिवंडीत पाचारण केले व तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.