कल्याण : हळदी समारंभ सुरू असताना एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिची हत्या केल्याची घटना २२ फेब्रुवारीला रात्री १ वाजता सापर्डे गावात घडली होती. पवन जगदीश म्हात्रे यानेच अनैतिक संबंधातून त्या महिलेची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या केल्याचे तपासात समोर आले होते. या घटनेत त्याची आई भारती जगदीश म्हात्रे या देखील जखमी झाल्या होत्या. दरम्यान, सखोल तपासात ही हत्या महागड्या चैनीच्या वस्तूंच्या हव्यासापोटी झटपट पैसे मिळविण्यासाठी दागिने लुटण्याच्या उद्देशाने पवनने केल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहायक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गायकर, अनिल पंडित व पथकाने केलेल्या तपासात एक मंगळसूत्र व नेकलेस असा सहा लाख ८० हजारांचा ऐवज आरोपी पवनच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर पवनला पिस्तूल मिळवून देणारे जयेश हाल्या जाधव आणि अजय गोविंद पवार या दोघांना अटक केली आहे. जयेश हा नेवाळी येथील तर अजय हा मध्य प्रदेश, धामनोद येथील रहिवासी आहे. अजयकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल २५ हजार रुपये किमतीला पवनने घेतले होते, हेही तपासात निष्पन्न झाले आहे.
-----------------