कल्याण : गर्दुल्ले आणि लुटारू यांच्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असतानाच फेरीवाल्यांकडून टाकण्यात येणाºया कचºयाचा भार सहन न झाल्याने कल्याण रेल्वेस्थानकातील बोरगावकर वाडीजवळील स्कायवॉकच्या तळाला असलेला फायबरचा पत्रा गुरुवारी दुपारी कोसळला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली, तरी फेरीवाल्यांचे अतिक्रमण धोकादायक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
नोव्हेंबर २०१४ मध्ये हा स्कायवॉक एमएमआरडीएकडून केडीएमसीला हस्तांतरित करण्यात आला. तेव्हापासून स्कायवॉकवरील दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणे, फेरीवाले, गर्दुल्ले, भिकारी यांच्या उपद्रवास आळा घालून स्कायवॉक केवळ पादचाऱ्यांकरिता खुला ठेवणे, याची जबाबदारी केडीएमसीची आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष झाल्याने फेरीवाले, गर्दुल्ले आणि भिकाºयांचे अतिक्रमण जैसे थे आहे. याठिकाणी बिनदिक्कत बाजार मांडणाºया फेरीवाल्यांकडून जमा झालेला कचरा स्कायवॉकच्या पाठीमागील आणि खालच्या बाजूस असलेल्या फायबर पत्र्याच्या पोकळीत टाकला जातो. येथे गर्दुल्ले उघडपणे नशा करीत असल्याने पत्र्यात जमा झालेल्या कचºयाला आग लागण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. खाली कोसळलेले पत्रे अंगावर पडल्याने रस्त्यावरून जाणारे काही नागरिक जखमी झाले आहेत, तर वाहनांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, भिवंडीचे खा. कपिल पाटील आणि कल्याण पश्चिमचे आ. नरेंद्र पवार यांनी स्कायवॉकचा दौरा केला होता. यावेळी पाटील यांनी स्कायवॉकवर स्वच्छता राखण्याच्या सूचना ‘क’ प्रभाग अधिकारी भारत पवार यांना दिल्या होत्या. परंतु, दौºयानंतर स्कायवॉकवरील अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या परिस्थितीत फरक पडला नसल्याचे दिसते.
रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्र मणाच्या मुद्यावर वर्षभरापूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा देणारे आ. पवार यांचे या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांचे बंधू भारत पवार हे येथील प्रभाग अधिकारी असल्याने त्यांची भूमिका मवाळ झाल्याची टीका विरोधक करीत आहेत.