भिवंडी : तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांना कोरोनावरील उपचारासाठी व बेड मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच खासगी रुग्णालयातील भरमसाठ बिलांमुळे कोरोना रुग्णांसह नातेवाईकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच ॲड. किरण चन्ने यांनी नागरिकांची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायती मार्फत ५० खाटांचे कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेलार गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. थेट कोविड सेंटर उभारणारी जिल्ह्यातील किमान एकमेव ग्रामपंचायत म्हणून शेलार ग्रामपंचायत सध्या चर्चेत आली आहे.
भिवंडीतील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांसाठी भिनार व सवाद या दोन ठिकाणीच शासकीय कोविड सेंटर आहेत. परंतु, या दोन्ही सेंटरमध्ये अजूनही हवी तशी सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेतांना पाहायला मिळतात. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या आर्थिक लुटीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना उपचारासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच ग्रामपंचायतींमार्फत कोविड सेंटर उभारण्यासाठी शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच ॲड किरण चन्ने यांनी मोठी मेहनत घेतली. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ५० खाटांचे हे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक त्या परवानग्या देखील ग्रामपंचायतीने घेतल्या असून शुक्रवारी या कोविड सेंटरची पाहणी भिवंडी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. लवकरच ते सुरू होणार आहे. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामामुळे आम्हाला अनेक अडचणी आल्या. आजही काही विघ्नसंतुष्ट शासकीय अधिकारी आम्हाला कोविड सेंटर उभारण्यासाठी शासकीय नियमांचे पाढे वाचून अडवणूक करीत आहेत. हे दुर्दैवी असून जिल्हाधिकाऱ्यांसह, जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील याकडे लक्ष देणे गरजेचे असून लवकरात लवकर ते सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया चन्ने यांनी दिली.