उल्हासनगर : स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सदस्य असलेले साई पक्षाचे गजानन शेळके सोमवारपासून नॉट रिचेबल असल्याने, भाजपला धक्का बसला आहे. समितीच्या १६ पैकी आठ सदस्य भाजपचे तर शिवसेना आघाडीचे सात सदस्य असून भाजप समर्थक साई पक्षाचे शेळके सदस्य आहेत.
उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्यापूर्वी स्थायी समितीमधील १६ पैकी आठ सदस्य निवृत्त झाल्यावर, त्याजागी गेल्या आठवड्यात नवीन सदस्यांची निवड झाली. समितीत भाजपचे आठ, भाजपसमर्थक साई पक्षाचा एक, शिवसेना पाच, रिपाइं एक व राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे. साई पक्षाच्या समर्थक सदस्यामुळे भाजपचे समितीमध्ये स्पष्ट बहुमत आहे. मात्र, शेळके सोमवारपासून नॉट रिचेबल झाल्याने, भाजपला धक्का बसला आहे. पक्षाचा सलग दुसऱ्यांदा सभापतीपदाचे स्वप्न भंगणार होणार असे बोलले जात आहे. उपमहापौर भगवान भालेराव हेही सभापतीपदासाठी इच्छुक असल्याने त्यांनीच शेळके यांना नॉट रिचेबल केले असे बोलले जात आहे. मात्र, भालेराव यांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहेत.
---------------------------------
सभापतीपदासाठी घोडेबाजार?
स्थायी समिती सदस्य गजानन शेळके नॉट रिचेबल झाल्याने समितीत शिवसेना आघाडी व भाजपचे समसमान मते झाली आहेत. गेल्यावर्षीप्रमाणे भाजप सदस्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाणार असून यामध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.