ठाणे : नौपाड्यातील रात्र निवारा केंद्राला विरोध झाल्याने ठाणे महापालिकेने ते कोपरीतील भाजी मार्केटच्या जागेवर उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याची निविदादेखील काढली आहे.परंतु, स्थानिक नगरसेवकांना अंधारात ठेवून अशा पद्धतीने रात्र निवारा केंद्र उभारणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करून कोपरीतील भाजपाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी त्याला विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी महापौर आणि सभागृह नेत्यांची भेट घेऊन ते रद्द करण्याची मागणी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने बेघरांसाठी रात्र निवारे उभारण्याचे आदेश पालिकांना दिले आहेत. परंतु, दिलेल्या निर्धारीत वेळेत पालिकेला हे निवारे उभारण्यात यश आलेले नाही. कोपरी येथे केंद्र सरकारचे दोन कोटी अनुदान आणि पालिकेच्या ९४ लाखांंच्या निधीतून रात्र निवारे उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, त्याला आणखी काही महिने लागणार आहेत.या मुद्यावर न्यायालयात पालिकेची कोंडी होणार असल्याने घाईगडबडीत नौपाड्यातील सोनी पथावर असलेल्या पालिकेच्या इमारतीत हा रात्र निवारा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु, त्याला भाजपाच्या नगरसेवकांनी विरोध केल्याने पालिकेने हा प्रस्ताव बासणात गुंडाळला होता.मात्र, आता आपला मोर्चा काही महिन्यांपूर्वी कोपरीत वळविला असून स्थानिकांचा विरोध डावलून भाजी मार्केटच्या प्रस्तावित जागेवरच ते उभारण्याचा घाट घातला आहे. या संदर्भातील प्रस्तावदेखील आयत्या वेळेचा विषयात महासभेत मंजूर करून घेतला आहे.त्यानुसार आता त्या कामाची निविदा प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. ही बाब स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर मंगळवारी त्यांनी या संदर्भात अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांची भेट घेतली.अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनपालिकेने जी जागा निश्चित केली आहे, त्याठिकाणी कोपरीतील बाधीत झालेल्या गाळेधारकांचे पुनर्वसन केले जाणार होते, तसा ठरावदेखील महासभेत झाला होता. दोन महिन्यांपूर्वी याबाबत हरकती, सुचनासुद्धा मागविल्य आल्या. असे असतांना त्याच जागेवर रात्र निवारा उभारण्याचा घाट कशासाठी असा सवाल त्यांनी केला आहे. त्यानुसार रात्र निवारा केंद्र रद्द करावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
मार्केटच्या जागेवर निवारा केंद्र, पालिकेने काढली निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 5:06 AM