अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील काकोळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेभोवती गोठ्यातील शेण टाकण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याची तक्रार करूनही त्यावर योग्य कार्यवाही होत नसल्याने सोमवारी या गावातील काही पालकांनी नरेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर शेण फेको आंदोलन केले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी शेण नेण्यास मनाई केल्याने पालकांनी विद्यार्थ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेत आपली समस्या मांडली.
काकोळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेशेजारीच मोठ्या प्रमाणात शेण टाकले जात असल्याने विद्यार्थ्यांना शेण तुडवत शाळेत प्रवेश करावा लागतो. त्यातच दुर्गंधीचा होणारा त्रास हा वेगळा. या प्रकरणी गायकर यांनी अनेकवेळा पंचायत समितीकडे केली होती. मात्र त्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. शाळेसमोरील परिस्थिती कायम राहिल्याने या गावातील काही पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसह आंदोलनाचा इशारा दिला. विद्यार्थ्यांना शेणाचा त्रास सहन करावा लागत असल्याने अधिकाºयांनाही त्याच्या दुर्गंधीचा त्रास व्हावा यासाठी शेण फेको आंदोलन केले. मात्र सुरक्षेमुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलीस ठाण्यात चर्चेसाठी बोलाविले. आंदोलनाच्या ठिकाणी शेण न नेण्याच्या अटीवर पोलिसांनी परवानगी दिली. अखेर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची सूचना मान्य केली.