कल्याण-भटक्या कुत्र्यांच्या विरोधात नेहमीच ओरड केली जाते. मात्र एका प्राणी मित्रच्या भूतदयेमुळे शेंझी नावाच्या भटकी कुत्री कॅन्सरच्या आजारातून बरी झाली. तिच्यावर प्लांट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी अर्थात पॉज या संस्थेने उपचार केले आहेत. शेंझी ही कल्याण पश्चिम परिसरात फिरणारी भटकी कुत्री गरोदर होती. तिची पिल्ले देण्याची वेळ जवळ आली होती. मात्र तिच्या योनीमार्गाला कॅन्सर झाला असल्याने तिच्या योनीला कॅन्सर ग्रोथमुळे सूज आली होती. त्यामुळे तिच्या पोटातील पिल्ले बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला होता. त्याची वेदना तिला असहाय्य झाली होती. त्यामुळे ती रस्त्याने अडखळत चालत होती. एका जोरदार गाडीने तिला जोराची धडक दिली. या धडकेत तिच्या पोटातील पिल्ले पोटातच मेली.
गौरीपाडा परिसरात राहणारे सिद्धेश यांनी तिची अवस्था पाहून डॉ. अमोल सरोदे यांना दाखविले. त्यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असे सूचित केले. शस्त्रक्रियेसाठी तिला पॉजच्या मुरबाड येथील पेट रुग्णालयात न्यावे लागेल असे सांगितले. सिद्देश यांनी पॉजचे प्रमुख निलेश भणगे यांना फोन कॉल केला. त्यांना केस सांगितली. पॉजची पेट रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने शेंझीला तातडीने अन्य पेट टॅक्सी करुन आणा असे सांगितले. सिद्धेश यांनी जान्हवी पेट टॅक्सी करुन शेंझीला मुरबाड येथील पॉजच्या पेट रुग्णालयात दाखल केले. शेंझीवर दुस:याच दिवशी डॉ. मंदार गावकर यांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर तिच्यावर आठवडाभर उपचार सुरु होते. या उपचारानंतर तिच्यावर कॅन्सर ग्रोथवर किमोथेरपी देण्यात आली. दर आठवडय़ाला किमोथेरपी उपचार दिल्यावर शेंझी कॅन्सरमुक्त झाली आहे. तिला जीवदान दिले. शेंझीला काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिला पुन्हा कल्याणला सोडण्यात आले आहे अशी माहिती पॉजचे प्रमुख भणगे यांनी दिली आहे.