नारायण जाधव
ठाणे : नागपूर आणि पुणे जिल्ह्यांच्या धर्तीवर आता राजधानी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातही सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधावाटप दुकानांमधून टाटा ट्रस्टच्या सहकार्याने लोह व आयोडिनयुक्त मिठाची विक्री करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे मीठ शिधापत्रिकाधारकांना जवळपास निम्म्या अर्थात १४ रुपये किलोने मिळणार आहे.नागपूर आणि पुणे शहरांतील शासनमान्य शिधावाटप दुकानांमधून लोह आणि आयोडिनयुक्त मिठाची विक्री करण्यास प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आली आहे. तेथील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता औरंगाबाद, नाशिक, अमरावतीसह मुंबई आणि ठाणे शिधावाटप यांच्या कार्यक्षेत्रातील फ परिमंडळातील शिधावाटप दुकानांमध्ये या मिठाची विक्री करण्यास अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मान्यता दिली आहे.अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार टाटा ट्रस्टमार्फत या लोह आणि आयोडिनयुक्त मिठाची वाहतूक जिल्ह्यातील गोदामापर्यंत करण्यात येणार आहे. तर, गोदामांपासून जिल्ह्यातील दुकानांपर्यंत ते पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.टाटांचा दर ११ रुपये किलोहे गुणवत्तापूर्ण डबल फोर्टीफाइड लोह आणि आयोडिनयुक्त मीठ टाटा ट्रस्ट शासनास ११ रुपये किलो दराने देणार असून शासन ते रास्तभाव दुकानदारांना १२ रुपये ५० पैसे दराने उपलब्ध करून देणार आहे. शिधावाटप दुकानदारांनी ग्राहकांना ते १४ रुपये किलोने देण्याचे बंधनकारक आहे. बाजारात लोह आणि आयोडिनयुक्त मीठ ३० रुपये किलोने मिळत आहे. लोह आणि आयोडिनयुक्त मीठ शिधावाटप दुकानामधून विक्री करण्यामागे संभाव्य आजारांना आळा घालणे, हा उद्देश आहे.दोन लाख कार्डधारकांना लाभ२०१४ च्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात एकूण एक लाख ९१ हजार ४२० शिधापत्रिका आहेत. यात बीपीएल पत्रिका ५६ हजार ४४३, अंत्योदय पत्रिका ४७ हजार ५१, केशरी पत्रिका ८० हजार ४९०, पांढºया ७०८२ आणि अन्नपूर्णांतर्गत ३०४ पत्रिकांचा समावेश आहे. या कार्डधारकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देणार आहे.