ठाणे :ठाणे येथील मनोरमा नगर भागात असलेल्या शिवसेना शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे दिसून आले. मंगळवारी मनोरमा नगर येथील शाखेवर बॅनर लावण्यावरून दोन्ही गट आमने-सामने आले. मनोरमा नगर येथील शिवसेनेच्या शाखेत शिंदे गटाचे पदाधिकारी बसले असताना ठाकरे गटातील काही महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी शाखेत घुसण्याचा प्रयत्न केला. तर शाखेवर लावण्यात आलेला शिंदे गटाचा बॅनर उतरवून ठाकरे गटाचा बॅनर लावण्याचा प्रयन्त केला गेला.त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे खा. राजन विचारे तसेच शिंदे गटाचे प्रवक्ते आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे देखील या ठिकाणी उपस्थित होते . संघर्ष वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी दाखल झाल्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढून अखेर शाखेला कुलूप लावले.
मनोरमा नगर परिसरात असलेल्या शिवसेना शाखेमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी बसले होते. याच दरम्यान राजन विचारे यांचे काही महिला आणि पुरुष कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि शिंदे गटाचा लावण्यात आलेला बॅनर उतरवून या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचा बॅनर लावण्याचा प्रयत्न केला गेला. मी आनंद आश्रम सार्वजनिक मोफत वाचनालय ज्यावर एकनाथ शिंदे यांचा फोटो वगळून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला होता. तर यापूर्वी शिंदे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये शिवसेना शाखा आनंद दिघे वाचनालय ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो देखील लावण्यात आला होता.
शाखेवरील बॅनर हटवण्यावरून दोन्ही गट एकमेकांच्या समोर आले. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले आणि पुढचा अनर्थ टळला. घटनेची माहिती कळताच ठाकरे गटाकडून खा.राजन विचारे, केदार दिघे तर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि या पट्ट्यातील शिंदे गटाचे समर्थक माजी नगरसेवक देखील दाखल झाले. यावेळी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांवर टीका करण्यात आली. पोलिसांनी मात्र या शाखेला सध्या कुलूप लावले आहे. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांवर जाणूनबुजून कारवाई केली जात आहे. महापालिकेला केवळ हेच काम आहे का ? रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते का बुजवले जात नाही. दबाव आणून अशाप्रकारे कारवाई केली जात आहे. - राजन विचारे, खासदार, ठाणे
" या शाखेचा नारळ आनंद दिघे यांनी फोडला आहे. या शाखेचे काम नगरसेवक करत असून त्यांनी कष्टाने ही शाखा बांधली असून याचे उदघाटन मुख्यमंत्र्यांनी केले होते. या शाखेवर नगरसेवकांचा अधिकार आहे. ही शाखा बळकावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने जागा घेऊन शाखा बांधा. जे लोक इतर पक्षाचे काम करत होते त्यांनी शाखांवर आपला अधिकार सांगू नये.- नरेश म्हस्के , प्रवक्ते, शिंदे गट