प्रशांत माने ।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात काही अपक्ष उमेदवारांची भाऊगर्दी दिसत असली, तरी शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यातच मुख्यत्वे लढत पाहायला मिळणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदीलाटेत शिंदे यांना कळवा-मुंब्रा मतदारसंघ वगळता अन्य पाच मतदारसंघांमध्ये भरभरून मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची भिस्त कळवा-मुंब्रा मतदारसंघावरच असेल, त्याचबरोबर भूमिपुत्राचा नारा हा कल्याण ग्रामीणमध्ये फायदेशीर ठरू शकतो, तर डोंबिवलीसह कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ हे मतदारसंघ शिंदेंसाठी फायद्याचे ठरू शकतात.
कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातील कळवा-मुंब्रा वगळता उर्वरित मतदारसंघांवर शिवसेना-भाजपची पकड आहे. २०१४ च्या निवडणुकीत मनसे रिंगणात होती, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी अशीच लढत त्यावेळी झाली होती. यंदा या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसह अन्य छोटे पक्ष रिंगणात असले, तरी यावेळीही प्रमुख लढत सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच पाहायला मिळणार आहे. येथील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेता शिवसेना दोन, सहयोगी अपक्षासह भाजपचे दोन, राष्ट्रवादीचे दोन असे आमदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा वगळता उर्वरित सर्वच मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार शिंदे यांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली होती. कळवा-मुंब्रा मतदारसंघात मात्र परांजपे यांना शिंदे यांच्यापेक्षा १२ हजार मते अधिक मिळाली होती. आताही याच मतदारसंघावर राष्ट्रवादीची भिस्त राहणार असून उर्वरित मतदारसंघांतून कशा प्रकारे राष्ट्रवादीचे पाटील मते मिळवतात, यावर त्यांच्या यशाचे गणित अवलंबून असणार आहे.
भूमिपुत्राचा नारा देत कल्याण ग्रामीणमध्ये मते मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. २७ गावांचा मुद्दा याठिकाणी प्रामुख्याने गाजणार आहे. सरकारविरोधात मतदान करा, असे आवाहन सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने घेतला, पण या समितीमध्ये शिवसेना आणि भाजपचे सदस्य असल्याने या आवाहनाला कितपत दाद मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.बाबाजी पाटील - केडीएमसीमध्ये राष्ट्रवादीचे अवघे दोन नगरसेवक आहेत. उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये अनुक्रमे चार आणि पाच नगरसेवक आहेत. शिवसेनेचे केडीएमसीत ५२ नगरसेवक आहेत. उल्हासनगरमध्ये २५ तर अंबरनाथमध्ये २२ नगरसेवक आहेत.डोंबिवलीमधून ९० हजार, कल्याण पूर्वेतून ७१ हजार ७६३, कल्याण ग्रामीण ८७ हजार ९२७, अंबरनाथ ६९ हजार ५९५ , उल्हासनगरमधून ६८ हजार २६ मते शिंदेंना २00९ च्या निवडणुकीत मिळाली होती. त्यावेळी परांजपे यांना कळवा-मुंब्रा येथून १२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते.
श्रीकांत शिंदे - डोंबिवली, कल्याण पूर्व, ग्रामीण, उल्हासनगर, अंबरनाथ हे मतदारसंघ शिवसेनेसाठी नेहमीच निर्णायक ठरले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या पाच मतदारसंघांतूनच शिवसेनेच्या शिंदेंना मताधिक्य मिळाले होते.