ठाणे: शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्या चव्हाणांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर 'आदर्श' घालून दिला. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व देत नसल्याचे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसात ते नाराज असून इकडे तिकडे जाणार आशा बातम्या येत आहेत, जे स्वतः विधान परिषदेच्या निवडणुकीला गैरहजर राहिले ते आता माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत असून त्याला फार महत्व देण्याची गरज नसल्याचंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं.
नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, माजी खासदार चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ नेते असले, तरीही गेली काही वर्षे निवडणूक हरल्यानंतर त्यांनी केलेली वक्तव्य ऐकली असती तर ते पक्षासोबत किती एकनिष्ठ आहेत हे सगळ्यांनाच समजलं असतं, त्यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाया पडतानाचा त्यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता. मात्र आता ते मातोश्रीचे मन जिंकण्यासाठी काहीही ते बरळत आहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.
आमदार अंबादास दानवे हे यंदा पहिल्यांदा टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला आले होते. यापूर्वी कधीही ते ठाणे शहरात या देवीच्या दर्शनाला आले नव्हते. यावेळी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी पहिल्यांदाच त्यांनी या नवरात्रोत्सवाला हजेरी लावली. देवीच्या दर्शनासाठी आल्याने त्यांचा उचित मान ठेवण्यात आला. दिघे साहेबांच्या पश्चात या देवीचा नवरात्रोत्सवाच आयोजन आणि त्यानी सूरु केलेले उपक्रम एकनाथ शिंदे हेच पुढे घेऊन जात असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं.