ठाणे : जोपर्यंत ठाण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंतची कल्याणची उमेदवारी जाहीर न करण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘शिवसेनेचे ठाणे व ठाण्याची शिवसेना’, अशी घोषणा देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाला नसल्याने ठाण्यातील शिवसैनिकांत अस्वस्थता वाढीस लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटल्यानंतर शिंदे यांच्या ठाण्यावर दावा करण्याच्या भाजपच्या खेळीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. ठाकरे गटाकडून राजन विचारे यांचे नाव अंतिम होऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शिंदे गटाला अद्याप विचारे यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार मिळालेला नाही. शिवसेनेच्या पहिल्या यादीतून ठाणे, कल्याणचे उमेदवार बाहेर राहिल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले.
ठाणे आणि पालघर या शिवसेनेच्या मतदारसंघांवर भाजपने दावा केला आहे. भाजपला गमावलेल्या ठाणे जिल्ह्यात पुन्हा पाय रोवायचे आहेत. महायुतीच्या पहिल्या निवडणुकीतच ही संधी भाजपला दिसत आहे. ठाणे भाजप सोडण्यास तयार नाही. पालघरमध्ये भाजपचा उमेदवार असल्यास पाठिंबा देऊ, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीने घेतल्याने शिंदे गटासमोर पेच निर्माण झाला आहे.
ठाणे हा बालेकिल्ला ठाणे हा बालेकिल्ला सोडण्याची तयारी शिंदे गटाची नाही. भाजपने ताणून धरले तर ठाणे राखून कल्याण सोडायचे हाच पर्याय त्यांच्यापुढे असल्याने श्रीकांत शिंदे यांचीही उमेदवारी लटकली. ठाणे सोडले तर भविष्यात विधानसभा व ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आक्रमक होईल व ठाण्यात शिवसेनेला क्षीण करेल, असे संकट समोर दिसत असल्याचे मत वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ठाणे पूर्व येथे पाटपूजन करण्यात आले; परंतु यावेळी शिंदे यांनी याविषयी भाष्य करणे टाळले.
प्रचार रथ तयारनागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार रथाचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ठाण्यात वाढविण्यात आला. महायुतीमधील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी विशेष रथ तयार करण्यात आला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असून महायुतीमधील सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो आहेत. या प्रचार रथावर ‘विकासाच्या गतीला... मोदींची गॅरंटी... मत महायुतीला’ ही टॅगलाईन लिहिली आहे.