ठाणे : शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील छुपी मैत्री सर्वश्रुत आहे. राजकारणात तशी मैत्री अनेक दिग्गज जोपासतात. आता या छुप्या मैत्रीला महाविकास आघाडीमुळे बळ मिळाल्याचे शुक्रवारी महापौर निवडणुकीतून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, आपल्या छुप्या मैत्रीला आता खुल्या दिलाने निभावण्यासाठी हे दोघेही सज्ज झाल्याचे दिसत आहे. ठाण्याच्या विकासासाठी आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के यांना उभयतांनी दिली आहे.राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, त्यापूर्वीच ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे स्थानिक पातळीवरील राजकारण पाहावयास मिळाले. गुरुवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात येऊन नरेश म्हस्के आणि उपमहापौर पल्लवी कदम यांचे महापौर दालनात अभिनंदन केले. त्याचवेळी जितेंद्र आव्हाड महानगरपालिकेत आले. तेही थेट महापौर दालनात गेले. यावेळी या तीन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील तिघांपैकी कोणीच प्रसारमाध्यमांना दिला नाही.महापौर दालनातील बैठकीनंतर पालिका मुख्यालयाखाली झालेल्या मुख्य कार्यक्रमातही शिंदे आणि आव्हाड हे एकाच मंचावर दिसले. यानिमित्ताने त्यांच्या छुप्या मैत्रीला बळ मिळाल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सर्वपक्षीयांनी सहकार्य केल्यामुळे महापौर निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारासमोर कोणी उमेदवार देऊ नये, असे आवाहन आपण पालिकेतील राष्ट्रवादीला केले होते, हे सांगायलादेखील ते विसरले नाहीत. यापुढे भाजपचे नाव न घेता सर्व पक्षांना बरोबर घेऊन ठाण्याच्या विकासाची वाटचाल केली जाईल, असे सूचक विधान करून त्यांनी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या राजकारणाला सुरु वात झाली असल्याचे संकेत दिले.याच मंचावर उपस्थित असलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी चांगल्याच राजकीय कोपरखळ्या मारल्या. ते म्हणाले की, महापौर नरेश म्हस्के यांची आणि माझी ओळख ही एकनाथ शिंदे यांच्या आधीपासून, अगदी विद्यार्थीदशेपासून आहे. याचा अर्थ ते माझ्यासोबत आहेत, असा होत नसल्याची कोपरखळी त्यांनी यावेळी मारली. मात्र, मी कोणत्याही मंचावर असलो तरी, माझ्यावर शरद पवार यांचा पूर्ण विश्वास आहे. आपल्या नेत्यांना निष्ठा स्पष्ट करावी लागत नसल्याचेदेखील ते सांगायला विसरले नाहीत. नरेश म्हस्के हे एखादा प्रस्ताव अडवण्यात तरबेज असून निदान आमच्यासंदर्भात ते आता तसे करणार नाहीत, असा टोमणादेखील आव्हाड यांनी यावेळी लगावला.शिंदे आणि आव्हाड यांच्यातील मैत्री यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसून आली होती. लोकसभेला छुपा का होईना, आव्हाडांनी शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या बाजूने कौल दिला होता. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत अनेक नावे चर्चेत असताना मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात नवखा चेहरा देऊन शिंदे यांनी आव्हाडांच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर केल्याचे दिसून आले होते. यातूनच शिंदे आणि आव्हाड यांच्यात छुपा अजेंडा होता, असे बोलले जात होते. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीनिमित्त या छुप्या अजेंड्यावर खुल्या मनाने शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून आले.‘मुख्यमंत्रीपदाबाबत श्रेष्ठी निर्णय घेतील’अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला पाहिजे, ही मागणी राष्टÑवादी कार्यकर्त्यांकडून होत आहे. यावर वरिष्ठ, म्हणजे स्वत: उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाशिवआघाडी ही महाविकास आघाडी झाली असून त्यातून शिव नाव वगळण्यात आले आहे.याबाबत काही माहीत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटेल, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मी केवळ एक सामान्य कार्यकर्ता असून महाशिवआघाडी कीमहाविकास आघाडी, याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याची प्रतिक्रि या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले की, मी फक्त महापौरांना शुभेच्छा देण्यासाठीच आलो होतो. ही कोणतीही राजकीय भेट नसल्याचेही आव्हाडांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचा पॅटर्न ठाणे महानगरपालिकेत आहे, असे नाही. ठाणे पालिकेमध्ये आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत, असे ते म्हणाले.
शिंदे, आव्हाडांच्या छुप्या मैत्रीला नव्या समीकरणांमुळे आणखी बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 12:59 AM