अजित मांडके
ठाणे : मनोरमा नगर येथे शाखा ताब्यात घेण्यावरून झालेला वाद शांत होत नाही तोच शुक्रवारी आनंद नगर कोपरी या भागात पुन्हा शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले. या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवरून हा वाद सुरू झाल्याचं बोललं जात आहे रात्रीपासून या शाखेच्या इकडे गर्दी होती, सकाळी मात्र शाखा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट समोरासमोर आले. त्यामुळे काही काळ या भागात तणाव झाला होता.
या घटनेनंतर या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी शाखेच्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी शाखेचे कुलूप उघडून शाखेचा ताबा घेतला. शाखेवर कोणीही हक्क सांगू नये, त्यांना काम करायचे असेल तर त्यांनी बसावे काम करावं शाखा शिवसेनेचीच आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी नरेश म्हस्के यांनी दिली. तर, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार देखे यांनी देखील या ठिकाणी धाव घेतली होती. कोपरी पाचपाखडी हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येतो. परंतु, त्यांच्या या मतदारसंघातच ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले.