सदानंद नाईक
उल्हासनगर : मतदारसंघावर शिवसेनेची नजर असल्यानेच पक्षाने वेटिंगवर ठेवल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी दिली. तर उल्हासनगर भाजपचा गड असून पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यालाही उमेदवारी जाहीर होऊ शकते, असे मत शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी व्यक्त केले आहे.
उल्हासनगर मतदारसंघातून पप्पु कलानी यांच्यापूर्वी तीन दशके भाजप व जनसंघाचे आमदार निवडून आले आहेत. तर आयलानी यांनीही पप्पु कलानी व ज्योती कलानी यांचा पराभव करून दोन वेळा आमदार पदी निवडून आले. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत आयलानी यांचे नाव नसल्याने, आयलानी यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. याबाबत आयलानी यांना प्रत्यक्ष विचारले असता दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीत नाव येऊ शकतो. असा विश्वास व्यक्त केला.
मात्र शिंदेगटाने मतदारसंघावर दावा केल्याने, उमेदवारीसाठी विलंब झाला असावा. अशी प्रतिक्रिया आयलानी यांनी दिली. तर दुसरीकडे पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी उल्हासनगर हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी घोषित होऊ शकते. अशी शक्यता आयलानी यांचे स्पर्धेत व उमेदवारीचे दुसरे दावेदार रामचंदानी यांनी व्यक्त केली.
शिंदेंसेनेचे नेते व माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पक्षाने उल्हासनगर मतदारसंघाची मागणी केल्याचे सांगितले. त्यासाठी आपण स्वतः इच्छुक असल्याचे चौधरी म्हणाले. तर दुसरीकडे लोकसभेला महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कलानी कुटुंब दोस्तीच्या नावाखाली रस्त्यावर उतरून घरोघरी शिंदे यांचा प्रचार केला होता. त्या उपकाराची परतफेड म्हणून शिंदेंसेनेने उल्हासनगर मतदारसंघावर दावा केला. असे बोलले जाते. शिंदेंसेनेला भाजपचा पारंपरिक असलेला उल्हासनगर मतदारसंघ मिळाल्यास, ओमी कलानी यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकतो. अशी चर्चाही शहरात रंगली आहे. कलानी कुटुंबाचे कट्टर समर्थक कमलेश निकम यांनी मात्र ओमी कलानी हे महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.