पंकज पाटील
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मंगलोर या गावाजवळील डोंगरावर लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांपैकी बहुसंख्य वृक्ष हे वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत. हा वणवा काही समाजकंटकांनी लावला असून त्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांनी शुक्रवारी मंगळूर येथील डोंगरावर जळालेल्या वृक्षांची पाहणी केली.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्टयातील मांगरूळ गावाजवळील डोंगरावर लावलेल्या वणव्यात दुसऱ्यांदा वनसंपदा नष्ट झाली आहे. या डोंगरावर तीन हेक्टर जागेवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले होते. गेल्यावर्षी हे वृक्ष वणव्यात सापडले होते. त्यानंतरही वन विभागाने पुन्हा ही झाडे जगविली होती. श्रीमलंग गड परिसरातील मांगरुळ या गावी वनविभागाच्या सुमारे 80 एकर जमिनीवर डॉ. शिंदे यांनी गेल्यावर्षी लोकसहभागातून एक लाख झाडे लावण्याचे महाअभियान राबवले होते. तब्बल 15 हजारहून अधिक नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अवघ्या काही तासात एक लाख झाडे लावली होती. या झाडांचे योग्य प्रकारे संगोपन व्हावे, यासाठी शिंदे यांनी या ठिकाणी स्वखर्चाने पाण्याच्या टाक्या आणि जलवाहिन्यांची व्यवस्था केली होती. मात्र वृक्षारोपण केल्यावर या वृक्षांनी मुळे धरलेले असतांनाच गेल्यावर्षी या डोंगरावर वणवा लागला. त्यात 80 टक्के वृक्ष जळाली. सुदैवाने वृक्षाभोवती असलेले सुके गवत काढण्यात आल्याने त्यातील बहुसंख्य वृक्ष वाचविण्यात वन विभागाला यश आले होते. जळालेले वृक्ष वाचविण्यासाठी खासदार शिंदे यांनीही खाजगी संस्थांची मदत घेत त्या वृक्षांचे संगोपन केले होते.
यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा या वृक्षांची वाढ झाली होती. एक लाख वृक्षांपैकी 90 टक्के वृक्ष जिवंत ठेवण्यात यश आले होते. मात्र बुधवारी रात्री याच डोंगरावर वणवा लागल्याने त्यात अडीच हेक्टर डोंगरावरील सर्वच्या सर्व वृक्षांना झळ बसली. त्यातील काही वृक्ष पूर्ण जळाले तर काही वृक्षांना वाचविणो शक्य होणार आहे. सलग दोन वर्ष एकाच डोंगरावर वणवा लागून वृक्ष जळत असल्याने वन विभागाचे अधिकारी नियोजन करण्यात कमी पडत असल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला आहे.एकच चूक दोनवेळा झाल्याने आता खासदार शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.