उल्हासनगर - येथील जीर्ण झालेल्या कामगार रुग्णालयाच्या ईमारतीच्या छताचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्ली येथील पंचदिप भवन कार्यालयात कामगार विमा योजना महासंचालक श्री. राजकुमार यांची भेट घेत कामगार रुग्णालयाची जुनी जिर्ण ईमारत लवकरात लवकर पाडण्यात यावी, तसेच रुग्णालयामध्ये सुरु असलेले सर्व उपचार केंद्र आणि तेथील कारभार लवकरात लवकर पोर्टा-केबिन अथवा विद्यमान सेंट्रल हॉस्पिटल येथे हलविण्यात यावे, अशी मागणी करत यासंदर्भात निवेदन दिले.
उल्हासनगर येथील कामगार विमा रुग्णालयाच्या धोकादायक झालेल्या इमारती पाडून रुग्णालयाचा पुनर्विकास करत तेथे सर्व सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय व्हावे, या मागणीकरिता १६व्या लोकसभेमध्ये दोन वर्षांपासून संसदेत प्रश्न मांडत, केंद्रीय मंत्री स्तरावर, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि कामगार विमा योजना विभागाकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत आहेत. या सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने कामगार रुग्णालयाच्या पुर्नविकासाला मंजुरी देत त्या ठिकाणी १०० खाटां असणाऱ्या आणि अत्याधुनिक सेवां-सुविधांनी सुसज्ज रुग्णालयासाठी रु.१२० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
सदर कामगार रुग्णालयाच्या धोकादायक इमारतीमध्ये सुरु असलेला रुग्णालयाचा कारभार नविन इमारतीमध्ये सुरु होईपर्यंत कामगार रुग्णालयाच्या कारभारासाठी भाडे तत्वावर जागा घेण्यासाठी दोने वेळा निविदा काढण्यात आल्या, परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे महासंचालक श्री. राजकुमार यांनी यावेळी सांगितले.
सद्यस्थितीत रुग्णालयात येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्या जीवाला धोका असल्याचे स्पष्ट करत यापुढे अश्या दुर्घटना होऊ नयेत, यासाठी रुग्णालयाची ईमारत लवकरात लवकर पाडण्यात यावी तसेच तेथील सर्व कारभार तातडीने पोर्टा-केबिन अथवा विद्यमान सेंट्रल हॉस्पिटल येथे हलविण्यात यावा, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महासंचालक श्री. राजकुमार यांना सुचना केल्या.