- पंकज रोडेकर ठाणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या शिवभोजन योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सात केंद्रांवर गेल्या दहा दिवसांत सहा हजार ५३७ जणांनी प्रत्येकी १० रुपयांमध्ये थाळीचा आस्वाद घेतला आहे.
जिल्ह्यासाठी दिलेल्या एक हजार ३५० थाळींचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणखी तितकीच केंद्रे उघडावी लागणार आहेत. परंतु, शासनाच्या अटी व शर्तींमध्ये केंद्रे सुरू करण्यासाठी लागणारी योग्य जागा मिळत नसल्याने कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर येथील नागरिकांना यापासून वंचित राहावे लागत आहे.कल्याण-उल्हासनगरात अपेक्षित जागा मिळाल्यावर, तेथे केंद्रे सुरू होतील. तोपर्यंत ज्या ठिकाणी ही योजना सुरू झाली आहे, त्याच ठिकाणी आणखी काही थाळ्या वाढवून देता येतील का, याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही योजना शासनाने महापालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका असून त्या महापालिका कार्यक्षेत्रांत प्रत्येकी दोन केंदे्र कशी सुरू करता येतील, असा विचार करून शिधावाटप विभागामार्फत जागांची पाहणी करण्यात आली. मात्र, शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण करू शकले, त्याच ठिकाणी ही केंदे्र सुरुवातीला तातडीने सुरू झाली आहेत.
१५-२० जणांनी शिवभोजन योजना सुरू करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार, संबंधित विभागांमार्फत पाहणी करण्यात आली. त्यानंतर, २६ जानेवारीला शिवभोजन योजनेंतर्गत ठामपा हद्दीत ३, भिवंडी-२, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एकेक केंद्र अशी सात केंद्रेसुरू करून तेथे ६७५ थाळ्यांचे वाटप हाती घेतले आहे. उर्वरित ६७५ थाळ्यांसाठी पुन्हा सात किंवा सहा केंद्रे लवकरात लवकर सुरू व्हावीत, यासाठी शिधावाटप विभागामार्फत धडपड सुरू झाली. या दहा दिवसांत नवी मुंबई, एफएमसी येथे एक केंद्र निश्चित झाले आहे.
जिल्ह्याबाहेरीलही इच्छुक : ठाणे जिल्ह्यात शिवभोजन योजनेंतर्गत केंद्र सुरू करण्यासाठी ठाण्यातील अधिकाऱ्यांना मुंबईसारख्या परिसरातील नागरिकांचे फोन येऊ लागले आहेत. त्यामुळे त्या इच्छुकांना त्या विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क करा, असा सल्ला देताना दिसत आहेत.
अधिकाऱ्यांसोबतचे किस्से
केंद्र सुरू करण्यासाठी एका इच्छुकाने ब्युटीपार्लर सुरू असलेल्या जागेत काही बदल करून ती जागा केंद्रासाठी कशी योग्य आहे, हे दाखवून दिले. काही जणांनी साहेब केंद्र सुरू झाले तर नोकरी नसलेली मुले कामधंद्याला लागतील, अशी विनवणी करून गळ घालण्याचा प्रयत्न केला. काहींनी जागा दाखवताना, गटारावरील किंवा कचराकुंडीसमोरील जागा दाखवल्या. तुम्ही परवानगी द्या, आम्ही स्वच्छता ठेवू, अशीही उत्तरे दिली. असे अनेक किस्से सूत्रांनी सांगितले.
टार्गेटपेक्षा जास्त थाळ्यांचे होतेय वाटप
या योजनेंतर्गत थाळीवाटपाची वेळ निश्चित केली आहे. दिलेल्या वेळेत थाळ्यांचे वाटप होताना दिसत आहे. ठाण्यात सुरू केलेल्या सात केंद्रांवर ६७५ थाळ्यांचे वाटप सुरू झाले आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त थाळ्यांचे वाटप होताना दिसत आहे. १ फेब्रुवारीला तर थाळ्यांची संख्या ६८१ वर पोहोचली होती.
शिवभोजन योजनेंतर्गत थाळ्यांचा तक्ता
तारीख थाळी२६ जानेवारी ५६३२७ जानेवारी ६३१२८ जानेवारी ६७०२९ जानेवारी ६६३३० जानेवारी ६७२३१ जानेवारी ६६५०१ फेब्रुवारी ६८१०२ फेब्रुवारी ६४२०३ फेब्रुवारी ६७५०४ फेब्रुवारी ६७५एकूण ६,५३७