कल्याण - शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना आज आदरांजली वाहण्यात आली. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण बस डेपोत छत्रपतींची वेशभूषा धारण करुन चक्क छत्रपती अवरतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
बस डेपोच्या कार्यशाळेत भागवत राजेंद्र पाटील हे सहाय्यक कारागीर पदावर कार्यरत आहे. पाटील यांचे शिक्षण अंबरनाथ औद्यागिक प्रशिक्षण संस्थेतून झाले आहे. पाटील हे उल्हासनगर कॅम्प नंबर एक परिसरात राहता. त्यांना शिवचरित्रची आवड आहे. त्या आवडीतूनच त्यांनी शिवबाची वेशभूषा परिधान केली. त्यांनी आज शिवजयंतीचे औचित्य साधून महाराजांची वेशभूषा परिधान केली. भगवा भरजरी अंगरखा, हाती तलवार घेऊन महाराज डेपोच्या पाहणीसाठी निघाली.
डेपोत धनंजय रायकर या वाहकाने महाराजांच्या जीवनावर रेखाटलेली रांगोळी प्रतिकात्मक महाराजांनी निरखून पाहिली. रायकर यांच्या रांगोळीला चांगली दाद दिली. तेव्हा रायकर यांनी चक्क महाराजांच्या सोबत सेल्फी काढला. महाराजांनी त्याठिकाणाहून आपला मोर्चा वळविला ते थेट शिवशाही या बसच्या दिशेने निघाले. ही शिवशाही बस नगरहून कल्याण डेपोत आली होती. त्या बसच्या वाहक चालकांची विचारपूस केली. त्यांना अगदी बरे वाटले. महाराजांनी डेपोच्या कार्यशाळेतील एका सहकाऱ्याच्या सोबतीने दुचाकीवरुन शिवाजी चौक गाठला. शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्य़ास प्रतिकात्मक शिवाजी नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी पारनाका, गांधी चौकात फेरफटका मारला. त्यांना पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. शिवाजी चौकात अभिवादनासाठी आलेल्या तरुणांच्या हाती भगवे झेंडे पाहून प्रतिकात्मक शिवाजीचे मन भरुन आले. अनेक तरुणांनी शिवाजी महाराजांच्या सोबत सेल्फी काढण्याचा आनंद लूटला.