शहापूर /भातसानगर : नाराज शिवसैनिकांना विश्वासात घेऊन समजूत न घालता उलट काही झाले तरी शिवसैनिक पक्षप्रमुखांचा आदेश पाळतील आणि कामाला लागतील असे गृहीत धरल्यानेच त्याचा फटका शिवसेनेला बसून पांडुरंग बरोरा यांचा पराभव झाला. २०१४ च्या निवडणुकीत त्या वेळेस राष्ट्रवादीत असलेले बरोरा यांनी शिवसेनेचे दौलत दरोडा यांचा अवघा ५ हजार ५४४ मतांनी पराभव केला होता. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस होती ती पुढे वाढत गेली त्याचा परिणाम ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आला.
ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ तिवरे आणि पांडुरंग बरोरा यांच्यातील मतभेद विकोपाला गेले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कमी लागलेला निकाल हा आमदार बरोरा यांच्या साठी धोक्याची घंटा होती. राष्ट्रवादीतील वातावरण जर पुढे असेच राहिले तर विधानसभा निवडणूक आपल्याला जड जाईल हे लक्षात घेऊन बरोरा यांनी एकतर भाजप किंवा शिवसेनेत जाण्याचा पर्याय ठेवला होता. अखेर योग्य वेळ येताच बरोरा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेत असंतोष निर्माण झाला.
तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनी पुढाकार घेत बरोरा यांचा शिवसेना प्रवेशाचा सोपस्कार घडवून आणला. त्याला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला. बरोरा यांना उमेदवारी देण्याचे निश्चित होताच शिवसेनेत बंडाची ठिणगी पडली. दौलत दरोडा यांच्यासह इच्छुकांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यातील पसरलेली नाराजी दूर करता आली नाही . शिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपंचायत, खरेदी विक्र ी संघ तसेच अनेक ग्राम पंचायती आणि संघटनात्मक बांधणी असतानाही शिवसेनेत उमेदवार आयात करावा लागला हे निष्ठावान शिवसैनिकांच्या जिव्हारी लागले. नाराज शिवसैनिकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा आणि नाराजी जाहीरपणे मांडली.
परंतु हा सगळा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे आणि शिवसेनेचा आदेश पाळला पाहिजे असे सांगण्यात आले. शिवसैनिकांना विश्वासात घेऊन नाराजी दूर करता आली असती तर कदाचित सेनेचे मताधिक्य वाढले असते. आपल्यावर राष्ट्रवादीचा उमेदवार लादला गेल्यामुळे नाराज शिवसैनिकांनी मतदानाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली.