मुंबई - भाजपाचा नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या नेहमीच आक्रमक भूमिका घेत, कागदपत्रांच्या आधारे विरोधकांवर आरोप करत असतात. महापालिका किंवा राज्य सरकारवरही ते सातत्याने टीका करताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच, कंगना आणि बीएमसी प्रकरणातही त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. तर, 2 दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची हकालपट्टी करण्यासाठी राज्यपालांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता, आज आपण राज्यपालांच्या भेटीला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
आंबेशीव खुर्द ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपचे सर्वच 9 उमेदवार निवडून आले, म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये 4 भाजपा कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरीट सोमैय्या यांनी कल्याणमधील द कल्याण हॉस्पीटल येथे जाऊन जखमी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर, आज 5 वाजता, त्यांचा परिवारासोबत आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे सोमैय्या यांनी सांगितलंय.
प्रताप सरनाईकांविरुद्धही केलं आंदोलन
ठाणे विहांग गार्डन चे बी 1 आणि बी 2 बिल्डिंगचे 13 मजले अनधिकृत असल्याचा दावा करत या अनधिकृत बांधकामांमुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे नेते किरीट सोमाया यांनी ठाणे महानगरपालिका आणि ठाणे पोलिसांकडे केली होती. पण मागणी करुनदेखील प्रताप सरनाईक यांच्या विरोधात कोणतीच कारवाई न झाल्याने आज भाजपा नेते किरीट सोमैय्या, आमदार निरंजन डावखरे आणि भाजपा पदाधिकारी यांनी ठिकाणी आंदोलन केले. ठाणे महानगरपालिकेसमोर हे ठिय्या आंदोलन करत प्रताप सरनाईक यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. प्रताप सरनाईक यांच्याविरोधात कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदेलन केलं जाईल असा इशाराही सोमैय्या यांनी दिला होता.