उल्हासनगर : सोशल मीडियावर शिवसेना व पक्षप्रमुखांच्या विरोधात सोशल टीकाटिप्पणी करणाऱ्या भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या तोंडाला काळे फासून शिवसैनिकांनी मारहाण केली. मारहाणप्रकरणी न्यायालयातून जामीन मिळालेल्या शिवसैनिकांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला.
उल्हासनगरात शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करून प्रतिमा व पुतळ्याला जोडे मारो आंदोलन सुरू होते. तर दुसरीकडे सोशल मीडियावर सातत्याने शिवसेना व पक्षप्रमुखांवर आरोप व टीकाटिप्पणी करणारे भाजपचे नगरसेवक रामचंदानी यांना कार्यालयाबाहेर तोंडाला काळे फासून शिवसैनिक व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी युवासेनेचे अधिकारी बाळा श्रीखंडे, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर मरसाळे, संदीप गायकवाड, मोहम्मद शेख, विनोद सालेकर, अशोक खेत्रे, अस्लम यांच्यासह अन्य तीन ते चार इसमांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती.
या शिवसैनिकांची गुरुवारी जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, राजेंद्र शाहू, नगरसेवक राजेंद्र सिंग भुल्लर महाराज आदींनी त्यांचा सत्कार केला. दरम्यान, भाजप नगरसेवक रामचंदानी यांनी सोशल मीडियावर शिवसेनेने मारहाण केलेल्यांच्या सत्कारप्रकरणी थेट सिंधी समाजाला साकडे घालून शहरात काय चाललेले आहे, असे भावनिक आवाहन केले.