ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी झाला. या कार्यक्रमासाठी शासकीय ओळखपत्राअभावी प्रवेश न मिळाल्याने अनेक पदाधिकारी तसेच शिवसैनिकांचा हिरमोड झाला.
मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे हे प्रथमच ठाण्यातील विविध कामांच्या उद्घाटनासाठी गुरुवारी ठाण्यात आले होते. तीनहातनाका येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचेही लोकार्पण दुपारी त्यांच्या हस्ते झाले. सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम नियोजित असल्यामुळे १० वाजल्यापासूनच शिवसैनिक, पदाधिकारी याठिकाणी दाखल झाले होते. एरव्ही, पक्षप्रमुख ठाकरे यांच्या कार्यक्रमाला कोणत्याही शासकीय ओळखपत्राची गरज नसायची. त्यामुळे आताही शिवसैनिक या नात्याने प्रवेश मिळेल, या अपेक्षेपोटी अनेक शिवसैनिक तसेच नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले होते.
प्रत्यक्षात, महापालिकेने या कार्यक्रमासाठी पोलिसांच्या मार्फतीने बनविलेली ओळखपत्रेच अनेकांकडे नसल्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांना स्मारकाच्या प्रवेशद्वारावरच तासभर उभे राहावे लागले. यामध्ये वागळे विभागाचे ज्येष्ठ पदाधिकारी नारायण तांबे यांच्यासह अनेकांचा समावेश होता. काही शिवसैनिकांनी तसेच महापौर नरेश म्हस्के यांनी धावपळ करून प्रवेशद्वारावर स्वत: उभे राहून अनेकांना प्रवेश देण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्यांना हा प्रवेश देण्यात आला.
मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक राजन किणे हेही आपल्या काही कार्यकर्त्यांसह याठिकाणी प्रवेश करीत असताना त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने तेही या कार्यकर्त्यांसमवेत बाहेर पडले. पक्षप्रमुख ठाकरे हे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर असल्यामुळे आपल्याला सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रोटोकॉल पाळावाच लागेल, अशी समजूत काही शिवसैनिकांनी एकमेकांची काढली. तर, काहींनी मात्र उघड नाराजी व्यक्त करून प्रवेशद्वारातूनच हा कार्यक्रम पाहणे पसंत केले.
अर्ध्या तासाच्या कार्यक्रमासाठी सात तासांचा बंदोबस्त
मुख्यमंत्री ठाकरे ठाण्यात विविध कार्यक्रमांसाठी दाखल होणार असल्यामुळे ठाणे पोलिसांसाठी सकाळी ६ पासूनच बंदोबस्त लावण्यात आला होता. ११.३० च्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात दुपारी १ वाजता मुख्यमंत्री दाखल झाले. पुढे अर्ध्या तासाने ते निघून गेले. पण, तब्बल सात तासांचा बंदोबस्त लावल्याने अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना ताटकळत उभे राहावे लागल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.