कल्याण : केंद्रात आगरी समाजाच्या लोकप्रतिनिधीला प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने आगरी समाजात आनंदाची लाट उसळली असल्याची प्रचिती सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने आली. ठिकठिकाणी राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून आगरी लोकप्रतिनिधींनी पाटील यांचे जोरदार स्वागत केले.
पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा ठाण्यातून सुरू होऊन शीळ फाट्यानजीक पोहचली तेव्हा शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पलावा सिटी येथे पोहोचताच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाटील यांचे स्वागत करीत त्यांच्या यात्रा रथावर ते काही काळ विराजमान झाले. काटई नाका येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पाटील यांचे स्वागत केले. ही यात्रा पुढे मानपाडा येथे आली असता मानपाडेश्वर मंदिरानजीक २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार व उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी पाटील यांचे स्वागत केले. टाटा नाका येथे माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. या ठिकाणी बंजारा समाजाच्या महिलांनी त्यांची आरती केली. पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन आगरी समाजाने पाटील यांचे स्वागत केले.
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. ते भेदण्यासाठी भाजपने पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले. दि. बा. पाटील विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न आणि २७ गावांच्या विलगीकरणाचा मुद्दा या भागातील कळीचे मुद्दे आहेत.
आजोबांना भेटली नातवंडे
पाटील यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने पदाची शपथ घेण्यापूर्वी एक दिवस आधी पाटील दिल्लीला रवाना झाले होते. स्वातंत्र्य दिनापर्यंत दिल्ली न सोडण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्याने त्यांना पुन्हा घरी येण्यास वेळ मिळाला नाही. यात्रेला येण्यासाठी ते दिल्लीहून मुंबई विमानतळावर आले तेव्हा पाटील यांच्या नातवंडांनी त्यांना कडकडून मिठी मारली. आजोबा, नातवंडांच्या चेहऱ्यावर माया, वात्सल्याचा आनंद झळकत होता.
------------------
वाचली