लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दसऱ्याला रावणाचे दहन करतात. रावणाची सोन्याची लंका हनुमंताने जाळली. प्रभू रामचंद्रावर त्याची निष्ठ होती, अशा निष्ठावंतांच्या मदतीने रामाने रावणाला हरवले, असा टोला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावला.
दसरा मेळाव्यासाठी अनेक जण चालत येत आहेत. काही जण बीडवरून तर काही जण सोलापूरवरून येत आहेत. कुणी ठाण्यातून चालत येत आहेत. हा या मातीचा गुण आहे. ‘रुखीसुखी खायेंगे, पर भगवा झेंडा फडकायेंगे’, असे सावंत म्हणाले. सोमवारी रात्री त्यांनी टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले.
शिवसैनिक हा मातीत बसतो, मातीत खेळतो, असे सावंत म्हणाले. जे भगव्याचे एकनिष्ठ आहेत, त्यांना हे सोंगढोंग लागत नाही. तो फक्त शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकतो. एवढेच त्याच्या डोळ्यासमोर असते, असे सावंत म्हणाले. गेल्या ३० वर्षांपासून मी या देवीच्या दर्शनासाठी येत आहे. आनंद दिघे हे अतिशय प्रेमाने वागणारे नेते होते, तसेच ते कडवट शिवसैनिक होते. त्यांनी या देवीची स्थापना केली आणि तेव्हापासून मी या देवीला येणे सुरू केले, अशी आठवण त्यांनी सांगितली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"