ठाणे : १२ वर्षांनंतर होणा-या टीएमटी एम्प्लॉइज युनियनच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढतीत आता आश्वासनांच्या खैरातीची भर पडते आहे. युनियनवर कब्जा करताना शिवसेनेला शह देत भाजपाने ६१३ कामगारांना कायम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे.या कामगारांना कायम करण्याचे आश्वासन आधी शिवसेनेतर्फे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. पण ६१३ मतांसाठी भाजपाने ही खेळी खेळल्याचे स्पष्ट झाले.कामगारांच्या न्यायालयीन लढ्यानंतर २८ आॅक्टोबरला ही निवडणूक होणार आहे आणि त्यात शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. शरद रावप्रणीत पॅनलही रिंगणात आहे. निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने कामगारांना खूश करण्यासाठी थकबाकी देण्याचा निर्णय घेतला. तशी पहिल्या टप्प्यातील थकबाकी मिळालीही. तसेच ११३ कामगारांना पदोन्नती देण्याचा निर्णय जाहीर झाला, पण तो अंमलात आलेला नाही. १९९५-९६ या वर्षात लागलेल्या ६१३ कामगारांना अद्याप कायमस्वरूपी सेवेत सामील करून घेण्यात आलेले नाही. याबाबत कामगारांनी वारंवार लढादेखील दिला आहे. याच वर्षात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी या ६१३ कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामील करण्याचे आश्वासनदेखील दिले होते. तसे हे आश्वासन मागील कित्येक वर्षांपासून शिवसेनेकडून दिले जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. परंतु, या आश्वासनांची पूर्तता मात्र अद्यापही शिवसेनेला करता आली नसल्याची खंतदेखील कामगारांना बोचत आहे. कामगारांची हीच नाराजी ओळखून भाजपाकडून कामगारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.वागळे आणि कळवा आगारात सभा घेऊन भाजपाने आपले इरादेदेखील स्पष्ट केले आहेत. त्यानंतर, भाजपाने त्या ६१३ कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी गुरुवारी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान कामगारांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचा दावा भाजपाच्या मंडळींनी केला आहे.> श्रेयासाठी हालचालीकार्यशाळा सुधारावी, टीएमटीची स्थिती सुधारावी, कामगारांच्या समस्या सोडवण्याच्या मागण्याही भाजपाच्या शिष्टमंडळाने केल्या.शिवसेनेने श्रेय घेण्याआधीच भाजपाने श्रेयासाठी हालचाली करत कंबर कसल्याचे यातून दिसून आले.
शिवसेना-भाजपाकडून मतांसाठी आश्वासनांतही कुरघोडी, ६१३ कामगारांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 3:30 AM