ठाणे : दिव्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. हॉस्पिटलच्या मुद्यावरुन भाजप आक्रमक झाली आहे. तर शिवसेनेनेकडून देखील त्यांच्यावर पलटवार केला जात आहे. त्यातही आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने दिव्यातील राजकीय वाद येत्या काळात आणखी वाढणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दिवा परिसरात रुग्णालय उभारणीच्या मागणीसाठी भाजपच्या महिला पदाधिकारी ज्योती पाटील यांनी नुकतेच आंदोलन केले. या आंदोलनावरून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली होती. त्यापाठोपाठ आता हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला आहे. महिलांनी केलेल्या आंदोलनाची शिवसेनेचे उप शहर प्रमुख आदेश भगत यांनी समाज माध्यमांवर खिल्ली उडवत बदनामी केल्याचा आरोप दिवा भाजपचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
‘बंटी आणि बबलीच्या आंदोलनाकडे दिवावासियांसोबत स्थानिक पदाधिकारी आणि ठाण्यातील नेत्यांनी फिरवली पाठ, अशा आशयाचे संदेश आदेश भगत यांनी दिवा न्यूज या व्हाट्सअप ग्रुप वर टाकून भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवत दिव्यातील महिलांचा अपमान केला, असा आरोप भाजप अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे. याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून त्यात भगत यांच्यावर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.
बंटी और बबली ही काल्पनिक ठग, ब्लॅकमेलर, पैशांचा गंडा घालणारी, अधिकारी, व्यावसायिक लोकांना धमकी देणारी जोडी विषयी वायरल झालेला मॅसेज हा आपल्यालाच उद्देशून लिहला आहे असा समज करून शिवसेनेची बदनामी करणे चुकीचे असताना या मजकुरात भाजप ने केलेल्या आंदोलनाचा कोणताही थेट उल्लेख करण्यात आला नव्हता तसेच कुठल्याही पक्षाचा व पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. असे असताना वायरल झालेला मॅसेज आम्हालाच उद्देशून लिहण्यात आल्याचा गैरसमज करून दिवा भाजप अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शिवसेना दिवा शहर व शिवसेना उपशहर प्रमुख अॅड.आदेश भगत यांच्याविरोधात पोलिसात खोट्या तक्रारी करण्याचं काम व खोटी माहिती देऊन सोशल मीडियावर त्यांची बदनामी करण्याचे काम केले असल्याचा मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे.
मी कोणत्याही पक्षाचा, पदाधिकाऱ्यांच्या नावाचा, आंदोलनाचा व महिलांचा अपमान करणारी पोस्ट टाकलेली नसताना माझी खोटी तक्रार पोलिसात केली व माझ्या नावाचा उल्लेख करून तसा मजकूर सोशल मीडियावर टाकून व खोटी माहिती पुरवून बदनामीकारक बातमी छापून आणली व ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. त्यासंदर्भात तक्रार केल्याने पोलिसांनी सर्व माहिती तपासून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अॅड.आदेश भगत यांनी दिली आहे.