- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड हटविण्याची मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांना करून डम्पिंग न हटविल्यास १७ ऑगस्ट पासून आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर महापालिकेच्या प्रस्तावित उसाटने गाव हद्दीतील डम्पिंगला भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केल्याने, डम्पिंगवरून शिवसेना भाजप आमने-सामने आल्याचे चित्र आहे.
उल्हासनगरातील कचरा कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाला असून कचरा रस्त्यावर येत असल्याचा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी दत्तू पोळके यांनी केला. डम्पिंग ग्राऊंड वरील दुर्गंधीयुक्त सांडपाणी शेजारील झोपडपट्टी भागात जात असल्याने, त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.
डम्पिंगला पर्यायी जागा मिळण्यासाठी महापालिकेने शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर, एमआयडीसीच्या ताब्यातील उसाटने गाव हद्दीतील ३० एकर जागा महापालिकेला हस्तांतरीत केली. मात्र सदर जागेला स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून आमदार गणपत गायकवाड हेही गावकऱ्यांच्या बाजूने उभे राहिल्याने, महापालिकेच्या पर्यायी डम्पिंगचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता निर्माण झाली.
दरम्यान शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विभाग प्रमुख दत्तू पोळके यांनी महापालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन खडी खदान डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी केली. १७ ऑगस्ट पूर्वी डम्पिंग ग्राऊंड उसाटने गाव हद्दीतील जागेवर हटविले नाहीतर, शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा आयुक्तांना दिला. शासनाने महापालिकेला ३० एकर जागा देऊन महापालिकेला हस्तांतरीत केली. मात्र महापालिका अधिकारी ती जागा ताब्यात घेण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला.
महापालिकेने गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढायला हवी. मात्र त्या दृष्टीने प्रयत्न होत नसल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात महापालिका अधिकारी पोलीस सरंक्षणात जागा मोजणी साठी गेले होते. मात्र गावकऱ्यांनी जागा मोजणीला विरोध केला. तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी डम्पिंग जागा शाळे जवळ असल्याचे सांगून विरोध केला. तसेच दुसरी पर्यायी जागा मागण्याचा सल्ला महापालिका अधिकाऱ्यांना दिला.
डम्पिंगवरून भाजप-शिवसेना आमने-सामने
महापालिकेला डम्पिंग ग्राऊंड साठी शासनाने उसाटने गाव हद्दीत ३० एकर जागा दिली. मात्र या जागेवर डम्पिंग उभारण्याचा स्थानिक नागरिक व आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केला. तर शहर शिवसेनेने खडी खदान येथील डम्पिंग उसाटने येथील पर्यायी जागेवर हटविण्याची मागणी करून १७ ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिला. एकूणच डम्पिंग वरून शिवसेना-भाजप आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.