ठाणे : लसीकरणाच्या मुद्यावरून सोमवारी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. केंद्रानेच राज्याला लस दिल्याचे वक्तव्य भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेऊन महापौर नरेश म्हस्के यांनी त्याचा निषेध करून केंद्राने राज्यावर उपकार केले का, मग तसे जाहीर करावे, असा टोला लगावला. या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेत चांगलाच संघर्ष सभेत पेटला. दुसरीकडे ठाणे शहरात लसीकरण टोकनची बाहेर ४०० ते ५०० रुपयांना विक्री होत असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी केला. या संपूर्ण प्रकारच्या चौकशीची मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली.
लसीकरणाचे टोकन नगरसेवकांच्या माध्यमातून देण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी केल्याची माहिती भाजपचे नगरसेवक संदीप लेले यांनी सभेत दिली. या मागणीला राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी हरकत घेतली. लसीकरणासंदर्भात ठाणे महापालिका पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप एकीकडे करून पत्र द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला नगरसेवकांच्या माध्यमातून टोकन द्यावे, अशी मागणी करायची अशी दुटप्पी भूमिका भाजप घेत असल्याचा आरोप मुल्ला यांनी केला. आधी १८ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना लस देण्यात येऊ नये, अशी भूमिकादेखील भाजपनेच घेतली होती याची आठवण मुल्ला यांनी यावेळी करून दिली.