उल्हासनगर : ठाण्यात होणाऱ्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ओमी कलानी यांचा भाजपात प्रेश होणार हे नक्की झाल्यावर पुन्हा एकदा त्यांना विरोधाचा ठराव मंजूर करून घेत माजी आमदार कुमार आयलानी यांनी भाजपाच्या ‘शत-प्रतिशत’च्या स्वप्नांना पुन्हा खोडा घातला. त्याचवेळी शिवसेनेला बाजुला ठेवत रिपाइं आठवले गटाशी युतीची चर्चा उरकून घेतल्याने शिवसेनेत संताप आहे. शिवाय त्यांनी रिपाइंना दिलेल्या जागांवर आधीच ओमी कलानी यांनी उमेदवार निश्चित केल्याने जरी ओमी यांचा प्रवेश झाला तरी भाजपाला शिवसेना-रिपाइंच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल, अशी व्यूहरचनाच यातून झाल्याचे दिसून आले.दरम्यान, आजवर भाजपा प्रवेशाबाबत थेट काही न बोलणाऱ्या ओमी यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे प्रवेशाला संमती दिल्याची कबुली दिली. शिवसेनेविना भाजप-रिपाइंच्या या युतीत रिपाइंना १२ जागा सोडण्यात आल्या असून तीन जागांचा वाद खासदार कपिल पाटील यांच्यावर सोपवला आहे. भाजप-रिपाइंचे जागावाटप हा ओमींच्या प्रवेशाला खोडा घालण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश सुखरामानी यांनी दिली. रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांच्यासह इतर नेत्यासोबत सोमवारी युतीची बैठक घेऊन भाजपाने जागावाटप केले. रिपाइंला एकून १२ जागा देण्यात आल्या. प्रभाग एकमध्ये १, प्रभाग चारमध्ये २, प्रभाग सातमध्ये ३, प्रभाग आठमध्ये १, प्रभाग बारामध्ये २, प्रभाग अठरामध्ये ३ जागा दिल्या आहे. प्रभाग सातमध्ये रिपाइंना तीन जागा सोडण्यात आल्या असल्या, तरी या परिसरावर कलानी यांचे वर्चस्व आहे. तेथील चारपैकी तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे, तर एक रिपाइंचा आहे. ओमी यांनी येथे यापूर्वीच तीन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर या जागावाटपावर वाद होण्याची चिन्हे आहे. (प्रतिनिधी)महापालिका निवडणुकीत रिपाइं व भाजपाची युती झाली असून रिपाइंना १२ जागा सोडण्यात आल्या आहेत. शिवसेना-भाजपाची जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. वरिष्ठ नेत्यांचा आदेश येताच शिवसेनेशी युती केली जाईल. ओमी यांना पक्षात प्रवेश नाही. तसा ठराव पुन्हा कोअर कमिटीने मंजूर करून वरिष्ठांना पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना-भाजपाची युतीवर संक्रांत
By admin | Published: January 10, 2017 6:46 AM