१२ सदस्य असणाऱ्या कल्याण पंचायत समितीमध्ये सभापतिपदी महाविकास आघाडीमधील सेनेच्या अनिता वाकचौरे विराजमान झाल्या आहेत. परंतु सेनेच्या अंतर्गत धुसफुशीमुळे उपसभापतिपदी किरण ठोंबरे हे भाजपाच्या साह्याने विराजमान झाले आहेत. ठोंबरे हे शिवसेनेच्याच रमेश बांगर यांच्याविरोधात लढले. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचा सभापती आणि उपसभापतीसाठी शिवसेनेची भाजपाशी हातमिळवणी असे पाहावयास मिळत आहे.
------------
* पं.स. अंबरनाथ
अंबरनाथ पंचायत समितीमध्ये एकूण आठ सदस्य असून यापैकी पाच सदस्य हे शिवसेनेचे आहेत. पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मात्र, तरीदेखील शिवसेनेने राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे. तर पंचायत समितीमध्ये भाजपाचा अवघा एकच सदस्य निवडून आला आहे.
---------
* पं.स. मुरबाड
मुरबाड पंचायत समितीत आठ गणात १६ सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचे ११ व पूर्वीचे राष्ट्रवादीचे पण आता शिवसेनेत गेलेले पाच सदस्य आहेत. भाजपने आखलेल्या रणनितीत शिवसेनेचे अनिल देसले हे काही दिवसांसाठी उपसभापती झाले. मात्र, पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. सद्यस्थितीत सभापती व उपसभापती हे भाजपचेच आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शासकीय योजनांची सरपंचांना माहिती मिळावी यासाठी सरळगाव येथे मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात तालुक्यातील अनेक सरपंचांनी हजेरी लावून बहुतांश सरपंच शिवसेनेत दाखल झाल्याचे चित्र रंगवून वातावरण निर्मिती केली आहे.
-----------
* पं.स. शहापूर
शहापूर पंचायत समितीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र आहेत. तालुक्याच्या पंचायत समितीच्या एकूण जागा २८ आहेत. पैकी एक उमेदवार सुमन घारे यांचे निधन झाले. उर्वरितांमध्ये राष्ट्रवादीचे सहा, भाजपाचे तीन आणि अपक्ष असून उर्वरित सत्ताधारी शिवसेनेचे सदस्य सक्रिय आहे. त्यांच्यात जी धुसफूस आहे ती उपसभापती जगन पश्टे यांनी ठरल्याप्रमाणे उपसभापती पदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे सदस्य नाराज आहेत.
-----------
* पं. स. भिवंडी
भिवंडी पंचायत समितीत एकूण ४२ सदस्य आहेत. यात शिवसेनेचे २० सदस्य असून भाजपाचे १९, काँग्रेसचे दोन, मनसेचा एक सदस्य आहे. विशेष म्हणजे राज्यात महाघाडी सत्ता स्थापन होण्याआधीच भिवंडी पंचायत समितीत भाजप विरोधात स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन महायुती स्थापन केली होती. यामध्ये शिवसेना, काँग्रेस व मनसे एकत्र येऊन पंचायत समितीवर एकहाती सत्ता आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता सर्वच पक्ष एकत्र असून शिवसेनेचे रवी पाटील सभापती आहे. तर भाजपचे गजानन असवारे हे उपसभापती आहे.
--------